बाेगस डॉक्टरने केली शस्त्रक्रिया; तरुणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST2021-07-07T04:35:48+5:302021-07-07T04:35:48+5:30

गोंदिया : सालेकसा तालुक्याच्या साखरीटोला येथील एका बोगस डॉक्टरने चक्क २१ वर्षांच्या तरुणीच्या डोक्यातील गाठ काढली. परिणामी त्या तरुणीचा ...

Surgery performed by a bagus doctor; Death of a young woman | बाेगस डॉक्टरने केली शस्त्रक्रिया; तरुणीचा मृत्यू

बाेगस डॉक्टरने केली शस्त्रक्रिया; तरुणीचा मृत्यू

गोंदिया : सालेकसा तालुक्याच्या साखरीटोला येथील एका बोगस डॉक्टरने चक्क २१ वर्षांच्या तरुणीच्या डोक्यातील गाठ काढली. परिणामी त्या तरुणीचा चौथ्या दिवशीच मृत्यू झाला. या बोगस डॉक्टरवर सालेकसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. समीर रामलाल रॉय (५४, रा. साखरीटोला) असे अटक करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. त्याच्या बोगस शस्त्रक्रियेमुळे दमयंती सुरजलाल धुर्वे (२१, रा. मुरदोली ता. देवरी) या तरुणीचा २६ जून रोजी मृत्यू झाला.

दमयंती सुरजलाल धुर्वे या तरुणीच्या डोक्यावर मागील काही दिवसांपासून गाठ होती. ती गाठ काढण्यासाठी २३ जून २०२१ रोजी डॉ. समीर रामलाल रॉय याच्याकडे जाऊन तिने उपचार घेतले. आरोपीकडे शस्त्रक्रिया करण्याचा कसलाही परवाना नसताना त्याने चक्क त्या तरुणीच्या डोक्याची शस्त्रक्रिया केली! सायंकाळी तिला डॉक्टरने औषध दिल्यामुळे उलट्‌या झाल्या. २४ जून २०२१ रोजी दमयंतीला भोवळ येत असल्याने तिच्या वडिलांनी डॉक्टरला विचारणा केली. परंतु तिला गॅसेसची समस्या असेल, असे सांगून त्याने टाळले. वेळ जसजशी जात होती, तशी दमयंतीची प्रकृती गंभीर होत होती. तिला पुन्हा आरोपी डॉक्टर राॅयकडे उपचारासाठी घेऊन आले असता, त्याने दमयंतीला सलाईन लावून घरी जाण्यास सांगितले. परंतु दमयंतीची प्रकृती गंभीर बनल्याने तिच्या वडिलांनी २४ जून रोजी रात्री ८.५० वाजता गंभीर अवस्थेत तिला गोंदियाच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे उपचार घेताना २६ जून रोजी दुपारी १२.१५ वाजता तिचा मृत्यू झाला.

दमयंतीची चुकीच्या पध्दतीने शस्त्रक्रिया करण्यात आली होते. आरोपी डॉ. समीर रॉय याला शस्त्रकिया करण्याचा कोणताही प्राधिकृत परवाना वा नोंदणी नसतानाही त्याने शस्त्रकिया केली. त्यामुळे दमयंतीचा मृत्यू झाला आहे. तक्रारी सालेकसा पोलिसांनी डॉ. समीर रॉय याच्यावर भादंविच्या कलम ३०४, ४२०, सहकलम ३३, ३६ महाराष्ट्र वैधक व्यवसाय अधिनियम १९६१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला ६ जुलै रोजी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक भीष्मराज सोरते करीत आहेत.

............

१० हजारात केली शस्त्रक्रिया

डोक्यावर असलेली गाठ काढण्यासाठी बोगस डॉक्टर समीर रामलाल रॉय याने दमयंती सुरजलाल धुर्वे हिच्या शस्त्रक्रियेसाठी १० हजार रुपये घेतल्याची माहिती पुढे आली आहे. शस्त्रक्रिया करण्याचे ज्ञान नसताना किंवा शस्त्रक्रिया करण्याचा परवाना नसताना त्याने दमयंती सुरजलाल धुर्वे हिच्या जिवाशी खेळ केला. त्यामुळे जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांची शोधमोहीम घेण्याची गरज आहे.

Web Title: Surgery performed by a bagus doctor; Death of a young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.