लसीच्या मागणीपेक्षा पुरवठा कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:30 IST2021-04-22T04:30:19+5:302021-04-22T04:30:19+5:30
केशोरी : कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी प्रतिबंधात्मक लस देण्याची मोहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविली जात आहे. लस घेण्यासाठी ...

लसीच्या मागणीपेक्षा पुरवठा कमी
केशोरी : कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी प्रतिबंधात्मक लस देण्याची मोहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविली जात आहे. लस घेण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली आहे. मात्र मागणीच्या तुलनेत फक्त २५ टक्केच लसीचा पुरवठा होत असल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण मोहीम नियमित सुरू ठेवण्यात अडचण निर्माण होत आहे.
काही लोकांना कोव्हॅक्सिन, तर काही लोकांना कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस देण्यात आला. दुसऱ्या डोससाठी आवश्यक असणारा सहा आठवड्यांचा कालावधी संपला असतानाही दुसरा डोस घेण्यासबंधीचा मेसेज आला नाही. त्यामुळे दुसरा डोस मिळणार किंवा नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘आम्ही लस घेतली, तुम्ही कधी घेणार’ या ब्रीदवाक्याला सार्थ करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक दुसरा डोस मिळणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या या भयंकर महामारीवर मात करण्यासाठी लसीकरण हाच ९५ टक्के प्रभावी उपाय असल्याने शासनाने ज्येष्ठ नागरिक यांच्यानंतर लगेच ४५ वर्षांवरील नागरिकांना कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड या लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील सुरू असलेल्या लसीकरणासाठी नागरिक पुढे येत आहेत. त्यामुळे गर्दी होऊ लागली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागणी तुलनेत लसीचा पुरवठा होणारा साठा कमी पडत आहे. एकदिवस लसीकरण केल्यानंतर दुसऱ्यादिवशी लस येण्याची वाट पाहावी लागते. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकसंख्येच्या प्रमाणात मुबलक कोरोना लसीचा साठा पुरवून स्वतंत्र लसीकरणासाठी बूथ व्यवस्था करण्यात यावी, ज्याप्रमाणे पोलिओ लसीकरणासाठी बुथ व्यवस्था केली जाते, तशीच व्यवस्था कोरोना लसीसाठी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.