सहायक खरेदी पर्यवेक्षकाचा मनमर्जी कारभार
By Admin | Updated: March 11, 2016 02:23 IST2016-03-11T02:23:59+5:302016-03-11T02:23:59+5:30
नगर परिषदेच्या अति महत्वपूर्ण अशा खरेदी विभागात कार्यरत सहायक खरेदी पर्यवेक्षक नियमांना धुडकावून आपला ...

सहायक खरेदी पर्यवेक्षकाचा मनमर्जी कारभार
दोन महिन्यांपासून सुट्टीवर : १५ दिवसांनी पाठविला अर्ज, पालिकेकडून कारवाई शून्य
गोंदिया : नगर परिषदेच्या अति महत्वपूर्ण अशा खरेदी विभागात कार्यरत सहायक खरेदी पर्यवेक्षक नियमांना धुडकावून आपला मनमर्जी कारभार करीत असल्याचे दिसून येत आहे. दोन जानेवारीपासून सुट्टीवर असलेल्या महोदयांनी सुट्टीवर गेल्यानंतर १५ दिवसांनी आपला अर्ज ई-मेलद्वारे पाठविल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे हा त्यांचा नेहमीचाच तोरा असून नगर परिषद प्रशासन मात्र काहीच कारवाई करीत नसल्याचे दिसते. आपला मनमर्जी कारभार करीत असलेल्या या कर्मचाऱ्यावर पालिका प्रशासनाची मेहरबानी बघून कोठेतरी काही शिजत असल्याचे आता खुद्द नगर परिषदेच्या वर्तुळातच बोलले जात आहे.
नगर परिषद कार्यालयातील साहीत्य खरेदीसाठी करण्यासाठी एक विशेष विभागच आहे. या विभागामार्फतच पालिकेला लागणाऱ्या साहित्यांची खरेदी केली जाते. यात वर्षभराचे छापील साहीत्य, फर्निचर व इतर साहीत्यांचा यात समावेश होतो. आता या सर्व साहीत्यांसाठी निविदा मागविण्याची ही वेळ आहे. असे असताना मात्र विभागाचे सहायक पर्यवेक्षक प्रदीप खोब्रागडे २ जानेवारीपासून वैद्यकीय रजेवर गेले असल्याची माहिती आहे. यातही त्यांचा मोठेपणा असा की, सुट्टीवर गेल्याच्या १५ दिवसांनंतर त्यांनी आपला अर्ज मेलवर पाठविला आहे. डिसेंबर महिन्यातही ते दोन-चार दिवसच कामावर, एवढेच नव्हे तर सन २०१४-१५ मध्येही ते जानेवारी ते मार्च पर्यंत सुट्टीवर गेले होते असेही कळले.
आपल्या मनमर्जीप्रमाणे खोब्रागडेंचा कारभार सुरू असल्याने मात्र नगर परिषदेची कामे खोळंबली आहेत. याचा दैनंदिन कामांवरही परिणाम होत आहे.
खोब्रांगडेसह अन्य काही कर्मचारीही आपल्या मर्जीनेच कारभार करीत असल्याचीही माहिती आहे. मात्र खोब्रागडेंनी यात हद्दच पार केली असल्याचे दिसत असून ही त्यांची पहिली वेळ नसून नेहमीचाच तोरा आहे. असे असतानाही मात्र पालिका प्रशासनाकडून खोब्रागडेंवर काहीच कारवाई करण्यात आली नसल्याचे दिसते.
एका कर्मचाऱ्यावर पालिका प्रशासनाची मेहरबानी बघून मात्र अन्य कर्मचारी आता यात काही तरी गोलमाल असल्याचेही बोलू लागले आहेत. आता खोब्रागडेंवर काय कारवाई होते हे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)