सुपरसिक्स प्रॉडक्ट्स कंपनीला झटका
By Admin | Updated: September 8, 2015 03:59 IST2015-09-08T03:59:59+5:302015-09-08T03:59:59+5:30
गव्हाच्या पिठासाठी सुपरसिक्स प्रॉडक्ट्स कंपनीच्या प्रतिनिधीने दिलेल्या आयसीआयटीआय बँकेच्या खात्यात ४०

सुपरसिक्स प्रॉडक्ट्स कंपनीला झटका
गोंदिया : गव्हाच्या पिठासाठी सुपरसिक्स प्रॉडक्ट्स कंपनीच्या प्रतिनिधीने दिलेल्या आयसीआयटीआय बँकेच्या खात्यात ४० हजार रूपये भरणाऱ्या लहान व्यावसायिकाला वस्तू न पोहचविणाऱ्या सदर कंपनीला जिल्हा तक्रार निवारण न्यायमंचाचे चांगलाच झटका दिला. सदर कंपनीने ४० हजार रूपये नुकसान भरपाईसह देण्याचे आदेश न्यायमंचाने दिले आहे.
अनूप गोपाल मेश्राम रा. खैरबोडी ता. तिरोडा असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. गावातच उदरनिर्वाहासाठी ते किरणा दुकान चालवितात. सुपरसिक्स कंपनीच्या प्रतिनिधीने त्यांना गव्हाचे पीठ व इतर प्रॉडक्ट्स घेण्याची विनंती केली. यावर ते गव्हाचे पीठ घेण्यासाठी तयार झाले. कंपनीचे प्रतिनिधी व व्यवस्थापक यांनी त्यांना आयसीआयसीआय बँकेचे खाते क्रमांक देवून ४० हजार रूपये भरण्यास सांगितले. त्यानंतर सात दिवसांत वस्तू आपल्याला पोहोचती करण्यात येईल, असे कळविले. त्यानुसार तक्रारकर्ते मेश्राम यांनी २५ जून २०१२ रोजी आयसीआयसीआय बँकेच्या तिरोडा शाखेत रक्कम जमा केली. परंतु कंपनीकडून कुठल्याही वस्तू प्राप्त न झाल्यामुळे त्यांनी सदर कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला. मात्र त्यांनी अनेकदा खोटे आश्वासन देवून वस्तू देण्यास टाळाटाळ केली.
त्यामुळे तक्रारकर्त्याने कायदेशीर नोटीस पाठविले. परंतु त्या नोटीस ‘नोटीस इंटिमेटेड’ अशा शेऱ्यासह परत आल्या. त्यांच्या नोटीसची कंपनीच्या प्रतिनिधींनी कसल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे त्यांनी ग्राहक न्यायमंचात ३ जून २०१४ रोजी धाव घेतली. मंचामार्फत कंपनीचे प्रतिनिधी व व्यवस्थापक यांना नोटीस नोटीस पाठविण्यात आल्या. मात्र त्यासुद्धा ‘नोटीस इंटिमेटेड’ अशा शेऱ्यासह परत आल्या. त्यामुळे प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाद्वारे पारित करण्यात आले. ग्राहक मेश्राम यांनी बँकेत जमा केलेल्या रकमेची पावती, नोटीसेस व इतर कागदपत्रे दाखल केले.
न्यायमंचाने यावर कारणमीमांसा केली. ग्राहक मेश्राम यांनी ४० हजार रूपये भरल्यार वारंवार विनंती करूनही ४० हजार रूपये विरूद्ध पक्षाने त्यांच्या दुकानात माल पाठविला नाही. कायदेशीर नोटीसलासुद्धा त्यांनी उत्तर दिले नाही. तसेच न्यायमंचात देखील ते उपस्थित झाले नाही किंवा आपले म्हणणे देखील सादर केले नाही. त्यामुळे ग्राहक मेश्राम यांची तक्रार संपूर्ण दस्तऐवज पाहता जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दिले. या वेळी न्यायमंचाचे अध्यक्ष अतुल आळशी व सदस्य वर्षा पाटील यांनी एकतर्फी मंजूर केली.
तसेच ग्राहक मेश्राम यांना ४० हजार रूपये परत करावे. तक्रार दाखल झाल्याच्या तारखेपासून संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत दरसाल दरशेकडा नऊ टक्के दराने व्याज द्यावे. शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून पाच हजार रूपये द्यावे. तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रूपये द्यावे. या आदेशाचे पालन ३० दिवसांच्या आत करावे, असा आदेश ग्राहक न्यायमंचाने सुपरसिक्स प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लि.चे व्यवस्थापक व्यंकरिया रामन व एक्झिक्युटिव्ह निलेश चरडे यांना दिले. (प्रतिनिधी)