दिव्यांगांसाठीही ‘समर ट्रेनिंग’
By Admin | Updated: May 3, 2017 00:54 IST2017-05-03T00:54:43+5:302017-05-03T00:54:43+5:30
दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले जात असतानाच आता त्यांना परिपूर्ण करण्यासाठी सर्व शिक्षा अभियानाच्या अपंग

दिव्यांगांसाठीही ‘समर ट्रेनिंग’
सर्व शिक्षा अभियानाचा उपक्रम : शीघ्र हस्तक्षेप व कौशल्य विकास कार्यक्रम
कपिल केकत गोंदिया
दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले जात असतानाच आता त्यांना परिपूर्ण करण्यासाठी सर्व शिक्षा अभियानाच्या अपंग समावेशित शिक्षण कार्यक्रमांतर्गत ‘समर ट्रेनिंग’ दिले जाणार आहे. उन्हाळ््याच्या सुट्ट्यात दिव्यांगासाठी शिघ्रहस्तक्षेप व कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन १ मे पासून करण्यात आले आहे.
शिक्षण हा सर्वांचा अधिकार असून यापासून दिव्यांगही सुटू नये यासाठी सर्व शिक्षा अभियानाच्या अपंग समावेशित कार्यक्रमांतर्गत दिव्यांगांना शिक्षणाची दारे मोकळी करण्यात आली आहेत.
या कार्यक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांना परिपूर्ण बनविण्यासाठी कौशल्य विकसीत करणारे विविध कार्यक्रम व प्रशिक्षण दिले जाते. जेणेकरून आज दिव्यांग असले तरी हे विद्यार्थी पुढे कुणावर अवलंबून राहू नये, हा यामागचा हेतू असतो. यामुळेच अशा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अपंग समावेशित कार्यक्रम वरदान ठरत आहे.
आता उन्हाळ््याच्या सुट्ट्या लागल्या असून या सुट्ट्यांचा योग्य तो वापर व्हावा या उद्देशातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ‘समर ट्रेनिंग’चे आयोजन करण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील मुलांकरिता शिघ्रहस्तक्षेप कार्यक्रम, जे विद्यार्थी वर्ग पहिलीमध्ये या सत्रात दाखल होणार आहेत व दुसरीमध्ये गेलेल्या दिव्यांग मुलांकरिता शाळा पूर्वतयारी कार्यक्रम तर वर्ग ९ ते १२ पर्यंतच्या मुलांकरिता किमान कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन तालुकास्तरावर १ मे ते २० जून पर्यंत करण्यात आले आहे.
यामध्ये विद्यार्थ्यांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत फाईल, पायपोस, खडू, रांगोळी, गुलदस्ते, अगरबत्ती, टेबल क्लॉथ, क्राफ्ट, फिश पॉट तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
दिव्यांग मुलांना स्वयंरोजगाराकरिता मदत व्हावी व शिक्षणानंतर स्वत:चा किरकोळ व्यवसाय टाकता यावा या उद्देशातून हा प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जातो. याची संपूर्ण जबाबदारी समन्वयक विजय ठोकणे सांभाळत आहेत.
३४५ मुलांचा सहभाग
या कार्यक्रमात ० ते ५ वयोगटातील ११७ मुले शिघ्रहस्तक्षेप, वर्ग १ ते २ मधील १११ मुले शाळा पूर्वतयारी तर वर्ग ९ ते १२ पर्यंतची ११७ मुले किमान कौशल्य विकास कार्यक्रमात भाग घेणार आहेत. यासाठी सर्व शिक्षा अभियानाच्या अपंग समावेशित शिक्षण कार्यक्रमांतर्गत कार्यरत दोन जिल्हा समन्वयक, १५ तालुका समन्यवक व ४२ विशेष शिक्षकांना जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच यामध्ये सडक अर्जुनी तालुक्यातून ४९, तिरोडा तालुक्यातून २९, आमगाव तालुक्यातून ४१, सालेकसा तालुक्यातून ३६, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून २९, देवरी तालुक्यातून ७७, गोंदिया तालुक्यातून ५० व गोरेगाव तालुक्यातून ३४ मुले सहभागी होणार आहेत.
अपंगत्वाची ओळख लवकर झाल्यास योग्य ती उपाययोजना करून त्यावर मात करता येते किंवा त्याची तीव्रता कमी करण्यास मदत होते. याकरिता शिघ्रहस्तक्षेप कार्यक्रमातून पुढील दोन महिन्यांत हे काम केले जाणार आहे. ज्यांना कायमचे अपंगत्व आले आहे अशा वर्ग ९ ते १२ वी मध्ये शिकणाऱ्या दिव्यांग मुलांना विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
- उल्हास नरड
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. गोंदिया