उन्हाळी हंगामाने रेल्वे मालामाल
By Admin | Updated: June 10, 2015 00:42 IST2015-06-10T00:42:10+5:302015-06-10T00:42:10+5:30
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावरील गोंदिया एक महत्त्वपूर्ण स्थानक असून सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे म्हणून ख्यातीप्राप्त ...

उन्हाळी हंगामाने रेल्वे मालामाल
गतवर्षीची तुलना : एप्रिल-मे महिन्यात ५२ लाखांनी वाढले उत्पन्न
देवानंद शहारे गोंदिया
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावरील गोंदिया एक महत्त्वपूर्ण स्थानक असून सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे म्हणून ख्यातीप्राप्त झाले आहे. गतवर्षी एप्रिल व मे या दोन महिन्यांत या स्थानकावरून १२ लाख ६८ हजार ३५० प्रवाशांनी केला. यंदा याच दोन महिन्यात प्रवासी संख्येत तब्बल २२ हजार ११८ ची भर पडली असून रेल्वेला उत्पन्नात ५२ लाखांची भर पडली आहे.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावरील गोंदिया स्थानक जंक्शन असून चारही दिशांना रेल्वेगाड्या धावतात. गोंदियावरून नागपूरच्या दिशेने, रायपूरच्या दिशेने, चंद्रपूरच्या दिशेने व बालाघाटच्या दिशेने अनेक प्रवाशी गाड्यांची ये-जा सुरू असते. त्यामुळे गोंदिया स्थानक नेहमीच गजबजलेले दिसते. या स्थानकावरून दररोज जवळपास २० प्रवाशी आपला प्रवास करतात तर एवढेच प्रवाशी या स्थानकावर उतरतात. त्यामुळे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावर गोंदिया स्थानक झोनमधून सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे ठरले आहे.
एप्रिल २०१४ मध्ये गोंदिया स्थानकातून एकूण पाच लाख ९५ हजार ७७६ प्रवाशांनी प्रवास केला. त्याद्वारे दोन कोटी ९४ लाख ३१ हजार ७८८ रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. तर एप्रिल २०१५ मध्ये एकूण पाच लाख ८७ हजार २२८ प्रवाशांनी प्रवास केला. त्याद्वारे तीन कोटी २३ लाख तीन हजार ३३० रूपयांचे उत्पन्न मिळाले. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या नोंदीप्रमाणे, गतवर्षीच्या एप्रिल महिन्यापेक्षा एप्रिल २०१५ मध्ये तब्बल आठ हजार ५४८ प्रवासी घटले तरीसुद्धा उत्पनात मात्र २८ लाख ७१ हजार ५४२ रूपयांची भर पडली.
मे २०१४ मध्ये गोंदिया स्थानकातून सहा लाख ७२ हजार ५७४ प्रवाशांनी प्रवास केला. त्याद्वारे तीन कोटी ६४ लाख १७ हजार ७२३ रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. मे २०१५ मध्ये सात लाख तीन हजार २४० प्रवाशांनी प्रवास केला. त्याद्वारे तीन कोटी ८८ लाख नऊ हजार ५७० रूपयांचे उत्पन्न मिळाले. मागील वर्षीच्या मे महिन्यापेक्षा यावर्षीच्या (२०१५) मे महिन्यात तब्बल ३० हजार ६६६ प्रवाशांची भर पडली. त्यातून गतवर्षीच्या मे पेक्षा यावर्षी २३ लाख ९१ हजार ८४७ रूपयांचे अधिकचे उत्पन्न गोंदिया स्थानकाला मिळाले.
दोन महिन्यांचे उत्पन्न
७.११ कोटी
सन २०१४ च्या एप्रिल व मे या दोन महिन्यांत १२ लाख ६८ हजार ३५० लोकांनी गोंदिया स्थानकातून प्रवास केला होता. त्याद्वारे सहा कोटी ५८ लाख ४९ हजार ५११ रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. सन २०१५ च्या एप्रिल व मे या दोन महिन्यांत १२ लाख ९० हजार ४६८ लोकांनी प्रवास केला असून त्याद्वारे सात कोटी ११ लाख १२ हजार ९०० रूपयांचे उत्पन्न मिळाले. यावर्षी या दोन महिन्यात २२ हजार ११८ उन्हाळी प्रवाशांची संख्या वाढली असून उत्पन्नसुद्धा तब्बल ५२ लाख ६३ हजार ३८९ रूपयांनी वाढले.