वृद्ध कमलाबाईची पोटासाठी अशीही धडपड
By Admin | Updated: May 8, 2016 01:45 IST2016-05-08T01:45:46+5:302016-05-08T01:45:46+5:30
पोटाची भूक शमविण्यासाठी मनुष्य जिवापाड मेहनत करतो. वीतभर पोटासाठी दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी ग्रामीण भागातील जनता राब राब राबते.

वृद्ध कमलाबाईची पोटासाठी अशीही धडपड
बोंडगावदेवी : पोटाची भूक शमविण्यासाठी मनुष्य जिवापाड मेहनत करतो. वीतभर पोटासाठी दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी ग्रामीण भागातील जनता राब राब राबते. याचप्रकारे पोटाची खळगी भरण्यासाठी कमलाबाई आपला जीव धोक्यात टाकून तेंदूपत्ता संकलनाच्या कामात आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून मेहनत करीत आहे.
गावात तेंदूपत्ता हंगाम सुरू झाला. तेंदूपानाचा पैसा नगदी मिळतो म्हणून गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने पहाटेच्या वेळी घरुन जंगलामध्ये निघतात. घरामध्ये दोन पैसे यावे म्हणून देऊळगाव/बोदरा येथील ५५ वर्षीय कमलाबाई कुरसुंगे या सुद्धा आपल्या पतीसोबत पत्ता संकलनाच्या कामावर जात आहेत. पोटाची आग सर्व काही शिकवून टाकते व त्यानुसारच कमलाबाई ही तेंदूपत्ता तोडण्याचे काम शिकल्या.
जिवाची पर्वा न करता कमलाबाई झाडाच्या शेवटच्या टोकावरील पाने मोठ्या करामतीने तोडत होती. त्या मातेला विचारले असता ‘पोटासाठी’ सर्व काही करावे लागत असल्याचे तिने सांगितले. कमलाबाईच्या मेहनतीची निश्चितपणे तारीफ करावी लागेल. तिची धडपड करतानाचे दृश्य सदैव स्मरणात राहील. (वार्ताहर)