विविध मागण्यांसाठी केलेले माकपचे आंदोलन यशस्वी
By Admin | Updated: June 4, 2015 00:55 IST2015-06-04T00:55:23+5:302015-06-04T00:55:23+5:30
तिरोडा नगर परिषदेद्वारे राबविण्यात आलेल्या योजनांमध्ये अनेकांवर अन्याय झाला. त्याविरूद्ध व इतर मागण्यांसाठी मार्कवादी कम्युनिस्ट पक्षाने २८ मे रोजी बेमुदत धरणे आंदोलन केले.

विविध मागण्यांसाठी केलेले माकपचे आंदोलन यशस्वी
तिरोडा शहर : उद्या नगर परिषदेच्या सभेत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन
गोंदिया : तिरोडा नगर परिषदेद्वारे राबविण्यात आलेल्या योजनांमध्ये अनेकांवर अन्याय झाला. त्याविरूद्ध व इतर मागण्यांसाठी मार्कवादी कम्युनिस्ट पक्षाने २८ मे रोजी बेमुदत धरणे आंदोलन केले. याची दखल घेत नगर परिषदेने २ जून रोजी त्यांना आमंत्रित करून शुक्रवारी (दि.५) रोजी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सकारात्मक निर्णय घेण्याचे लिखित आश्वासन देण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, तिरोडा नगर परिषदेद्वारे घरकुुलाची योजना क्रियान्वित करण्यात आली. मात्र त्यासाठी एकटे राहण्यापुरतेच घर बांधकामासाठी अत्यल्प निधी देण्यात आला. काहींनी सरकारी आबादी जमिनीवर अतिक्रमण करून खोट्या रजिष्ट्रीच्या आधारे महसूल विभागाशी संगनमत करून स्वत:च्या नावे सात-बारा बनविला. काहींनी आदिवासीच्या घरांची रजिष्ट्री होत नसताना अनधिकृतपणे राहून घरांवर कब्जा केला आहे. तर झुडपी जंगल असल्याचे सांगून झोपडपट्टीवासियांना घरकूल योजनेपासून दूर करण्यात आले. एकाला काहीच नाही तर काहींना मुबलक प्रमाणात जमीन देवून दुरूपयोग करण्यात आला. शहरात इतर महापुरूषांच्या नवीन प्रतिमा स्थापित करण्यात आल्या. मात्र चौकी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सौंदर्यीकरणाच्या नावे केवळ पेंट लावण्यात आला. दरम्यान जुन्या कार्यकर्त्यांची नावे व उद्घाटन फलक हटविण्यात आले.
काही नागरिकांच्या घरासमोर कचरापेटी लावून कचरा गोळा केला जातो, स्वच्छता केली जाते. तर काही घरांसमोर कचरा कायम ठेवला जातो. नाली, दिवे, रस्ते व बोअरवेल आदी कार्यात भेद केला जातो. शाकाहारी व मांसाहारी दुकाने एकाच ठिकाणी स्थापित करून धार्मिक संस्कृती पाळणाऱ्या नागरिकांच्या भावना दुखावण्याचे कार्य केले जाते. दैनिक गुजरी कर व वसूलीत मोठी वाढ करण्यात आली. लहान दुकानदारांनी जागेचा वापर केल्यास दंड व मोठ्या दुकानदारांना सुट अशा कार्यप्रणालीविरूद्ध माकपने आंदोलन केले. याची दखल घेत शुक्रवार (दि.५) रोजी न.प. ने सर्वसाधारण सभा घेवून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
आंदोलनाचे नेतृत्व मार्क्सवादी कॉम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव महेंद्र वालदे, जयेंद्र बागडे, चंद्रकला कुत्राहे, गोमा मेश्राम यांनी केले. तर राजेंद्र चोपकर, बुधा बनकर, नरेश विठोले, संजू बानेवार, तारेंद्र मंदुरकर, सहेसराम शहारे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)