मोरवाही येथील आंदोलनाची यशस्वी सांगता ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:35 IST2021-09-09T04:35:28+5:302021-09-09T04:35:28+5:30

गोंदिया : तालुक्यातील ग्राम मोरवाही येथील बौद्ध समाज बांधवांचे बुद्धविहाराच्या मागणीसाठी १२ ऑगस्टपासून धरणे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन ...

Successful conclusion of Morwahi agitation () | मोरवाही येथील आंदोलनाची यशस्वी सांगता ()

मोरवाही येथील आंदोलनाची यशस्वी सांगता ()

गोंदिया : तालुक्यातील ग्राम मोरवाही येथील बौद्ध समाज बांधवांचे बुद्धविहाराच्या मागणीसाठी १२ ऑगस्टपासून धरणे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन शांततेत सुरू असतानाच सोमवारी (दि. ६) रात्री येथील काही लोकांनी आंदोलन मंडपावर हल्ला करीत नासधूस केली. परंतु पोलीस विभागाने चोख बंदोबस्त लावून गावगुंडांना आवरल्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यातच मंगळवारी (दि. ७) जिल्ह्यातील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे हजेरी लावत कारवाईचे आश्वासन दिल्यामुळे तूर्तास २५ दिवसांपासून सुरू असलेले हे आंदोलन समितीतर्फे मागे घेण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला.

मागील २५ दिवसांपासून येथे बुद्ध विहार बांधकामासाठी तसेच दोषी असलेल्या गावातील पवन हेमने, चंद्रभान ठाकूर व राजू ब्राह्मणकर यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी येथील बौद्ध बांधवांचे धरणे आंदोलन सुरु होते. हे आंदोलन सुरू असतानाच आरोपी असलेल्या तिन्ही व्यक्तींनी आंदोलनस्थळी गणपती बसविण्याचे कारण पुढे करून आंदोलनकर्त्यांशी वादाला सुरुवात केली. त्यातच सोमवारी (दि. ६) पोळ्याच्या रात्री शे-दोनशे लोकांना जमवून त्यांनी आंदोलन मंडप उधळून लावण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी तिथे उपस्थित पोलिसांनासुद्धा धक्काबुक्की करीत सरपंच राधेश्याम भिमटे यांना मारहाण केल्याची बाब समोर आली आहे. मात्र पुढे कोणताही अनर्थ घडू नये म्हणून पोलिसांनी संयमाची भूमिका घेत त्यांना पळवून लावले. त्यातच सदर प्रकरण पुढे वाढू नये व समाजात जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी मंगळवारी (दि.७) जिल्ह्यातील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले.

यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, गटविकास अधिकारी खोटोले, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र खोब्रागडे, व स्वतः पोलीस अधीक्षक उपस्थित झाले. एवढी मोठी घटना घडूनही येथील ग्रामसेवक ललित सोनवणे हे बेपत्ता असल्याने त्यांच्या कार्यशैलीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केला.

--------------------------

लेखी आश्वासनाने आंदोलनाची सांगता

गावात आलेल्या अधिकाऱ्यांनी २ दिवसांत दोषी असलेल्या सर्व अधिकारी, ग्रामपंचायत प्रशासन व तिन्ही कंत्राटदारांवर कारवाईचे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर येथील बौद्ध समाजबांधवांनी तूर्तास आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान, कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Web Title: Successful conclusion of Morwahi agitation ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.