हत्येच्या कटाचा छडा लावण्यात यश
By Admin | Updated: March 19, 2015 01:10 IST2015-03-19T01:10:43+5:302015-03-19T01:10:43+5:30
इसापूर येथे गेल्या दि. ८ मार्चच्या रात्री शेत झालेल्या विजेश गोपीनाथ लांडगे (३४) या युवकाच्या हत्याकांडात सहभागी असणाऱ्या पाचही आरोपींना पकडण्यात अर्जुनी मोरगाव पोलिसांना यश आले.

हत्येच्या कटाचा छडा लावण्यात यश
इसापूर : इसापूर येथे गेल्या दि. ८ मार्चच्या रात्री शेत झालेल्या विजेश गोपीनाथ लांडगे (३४) या युवकाच्या हत्याकांडात सहभागी असणाऱ्या पाचही आरोपींना पकडण्यात अर्जुनी मोरगाव पोलिसांना यश आले. या घटनेनंतर आरोपी लतीश ओमप्रकाश गजभिये (२९) याने पोलिसांकडे आत्मसमर्पण करून खुनाचा गुन्हा कबूल केला होता. मात्र इतर आरोपी फरार होते.
लतीशला अटक केल्यानंतर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबूल केला. साक्षीदाराकडे पोलिसांनी विचारपूस केली असता आरोपी लतीश गजभिये हा पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचे जाणवले. त्यामुळे पोलिसांनी गुप्त माहिती काढून सूत्र हलविले. त्यानंतर इसापूर गावातील एका साक्षदाराने मृतक विजेश लांडगे याला मारण्याचा कट दि.८ मार्च रोजी काही लोकांनी केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी खात्री करून या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या मेघनाथ गजभिये (२१) रा.कन्हारगाव याला अटक केली.
अटक केलेल्या दोन्ही आरोपींकडे कसून चौकशीदरम्यान मृत विजेश यास दि. ८ मार्च १५ रोजी जिवानिशी ठार मारण्याचा कट दोन आरोपी व त्यांच्या साक्षीदाराकडून आखण्यात आल्याचे उघड झाले. तपासादरम्यान पोलिसांनी मृतक विजेश सोबत सिरोली येथे लावणीचा कार्यक्रम पहाण्यासाठी कोण आले होते याबाबत सखोल तपास केला. त्यानंतर एक इसम विजेशसोबत लावणी कार्यक्रम पहाण्यासाठी गेला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली. पुन्हा संशयित इसमांकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी आरोपी ओमप्रकाश गजभिये (५५) रा. पुयार, झकेश उर्फ चंद्रकांत गजभिये (२८) रा. चंद्रपूर यांना अटक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी गुन्ह्यात भादंवि कलम ३०२, १२० (ब), ३४ (फौजदारी कट रचून ठार मारणे) कलम वाढविण्यात आली.
अटकेतील आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच ३४/एसी-५५१९) व (एमएच ३६/आर-१७३३) या दोन दुचाकी, मिरची पावडर, इडियाडोह मुख्य कालव्यात टाकलेली बांबूची काठी जप्त केली. या कटानंतर इतर आरोपींना अटक होवू नये या उद्देशाने मुख्य आरोपी लतीश याने गुन्हा कबूल करून पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी आरोपींना गजाआड करण्यात यश मिळविले.
बुधवारी पोलिसांनी आरोपींची पोलीस कोठडी मागितली असता न्यायालयाने न्यायालय कोठडी दिली. त्यांची तुरुंगात रवानगी केली. पुढील या गुन्ह्यात पोलीस अधीक्षक शशीकुमार मिना, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राजेश गज्वल, सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस नाईक गजानन शिंदे, रोशन गोंडाणे, विनोद बिल्लोरे, मुकेश थेर, लोथे, कोरेटी व इतर चमूने परिश्रम घेतले.