हत्तीरोग दुरीकरण मोहीम यशस्वी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:10 IST2018-02-14T00:09:13+5:302018-02-14T00:10:54+5:30
जिल्ह्यातील ग्रामीण भागात १० ते १२ फेब्रुवारी आणि शहरी भागात १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दुरीकरणासाठी डीईसी व अल्बेंडाझॉल गोळ्यांची सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येत आहे.

हत्तीरोग दुरीकरण मोहीम यशस्वी करा
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण भागात १० ते १२ फेब्रुवारी आणि शहरी भागात १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दुरीकरणासाठी डीईसी व अल्बेंडाझॉल गोळ्यांची सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येत आहे. ही हत्तीरोग दुरीकरण मोहीम सर्वांनी सहकार्य करून यशस्वी करा, असे आवाहन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र दासगाव अंतर्गत लहीटोला येथील आरोग्य उपकेंद्र इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
आरोग्य उपकेंद्र पांढराबोडी येथील कर्मचारी बांगर यांना डीईसी व अल्बेंडाझॉल औषधाच्या गोळ्या सेवन करवून जिल्हास्तरीय हत्तीरोग दुरीकरण मोहिमेचा शुभारंभ आमदार अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी जि.प. अध्यक्ष सीमा मडावी, जि.प. सभापती अंबुले, लता दोनोडे, शैलजा सोनवणे, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. खोडनकर, सरपंच दिनेश तुरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यात राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत समाजातील हत्तीरोग जंतूभार कमी करणे व हत्तीरोगाचा प्रसार थांबविणे, हायड्रोसील व हत्तीपाय रु ग्णांना विकृतीपासून दूर ठेवण्याचे उदिद्दष्ट डोळ्यासमोर ठेवून ही मोहीम यशस्वी करण्यात येत आहे.