श्रमातून फुलले नंदनवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:08 IST2018-03-16T00:08:19+5:302018-03-16T00:08:19+5:30
येथील काही युवकांनी एकत्र येवून दुर्लक्षित असलेल्या पवन तलावाचा विकास करण्याचा संकल्प करुन तो तडीस नेला. तब्बल ४५ रविवार पवन तलावाच्या ठिकाणी युवकांनी श्रमदान करुन या तलावाचा कायापालट केला.

श्रमातून फुलले नंदनवन
गोरेगाव : येथील काही युवकांनी एकत्र येवून दुर्लक्षित असलेल्या पवन तलावाचा विकास करण्याचा संकल्प करुन तो तडीस नेला. तब्बल ४५ रविवार पवन तलावाच्या ठिकाणी युवकांनी श्रमदान करुन या तलावाचा कायापालट केला. येथील आशीष बारेवार यांनी या तलाव परिसराचा पर्यटन केंद्राच्या धर्तीवर विकास करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कार्याला गावातील इतर युवकांनी साथ दिली. त्यामुळेच गोरेगाव येथील पवन तलाव अल्पावधीतच नावारुपास आले. या तलाव परिसराला भेट दिल्यानंतर आणि तेथील नैसर्गिक सौंदर्य पाहून प्रत्येकाच्या मुखात केवळ एकच वाक्य असते. ते म्हणजे युवकाच्या श्रमदानातून पवन तलावाचे नंदनवन झाले. युवकांनी परिसराचा विकास केला. शिवाय टाकाऊ वस्तुंचा उपयोग करून परिसराच्या सौंदर्यात आणखी भर घातली. तलावाच्या परिसरात कुटी तयार केल्या. टाकाऊ टायरला रंगरगोटी करुन त्याचा उपयोग वृक्षांसाठी कठडे म्हणून केला. तर टाकाऊ रंगाच्या डब्यांचा उपयोग पक्ष्यांसाठी घरटे तयार करण्यासाठी केला. पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली असून झाडांना पाण्याचे पात्र लावले.
(छायाचित्र: दिलीप चव्हाण)