लेखणीतून समाजाचे प्रतिबिंब दिसते
By Admin | Updated: August 19, 2015 02:07 IST2015-08-19T02:07:30+5:302015-08-19T02:07:30+5:30
पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. समाजाला घडविण्याचे काम पत्रकार करतात. विविध प्रकारच्या समस्या व प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम ...

लेखणीतून समाजाचे प्रतिबिंब दिसते
पालकमंत्री बडोले : श्रमिक पत्रकार संघाचा पुरस्कार सोहळा
गोंदिया : पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. समाजाला घडविण्याचे काम पत्रकार करतात. विविध प्रकारच्या समस्या व प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम पत्रकार आपल्या लेखणीतून करतात. पत्रकारांच्या लेखणीतून समाजाचे प्रतिबिंब उमटत असते, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
स्वातंत्र्यदिनी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात उद्घाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आ. गोपालदास अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिष कळमकर, जि.प.चे सभापती पी.जी. कटरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड उपस्थित होते. अध्यक्षस्थानी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष हाजी अफताफ शेख होते.
गोंदियातील पत्रकार भवनाचा प्रश्न बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहे. या प्रकरणी लवकरच तोडगा काढून पत्रकार भवनाचा मुद्दा सोडविण्यात येईल, असे बडोले म्हणाले.
पत्रकारांनी विधायक स्वरुपाची टीका लेखणीतून करावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अतिथींच्या हस्ते यावर्षीच्या टिळक गौरव पुरस्कार महेश अग्रवाल, स्व. मनोहरभाई पटेल संपादकीय पुरस्कार उदय चक्रधर, स्व. संतोष अग्रवाल स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार खेमेंद्र कटरे व ओमप्रकाश सपाटे यांना देण्यात आला. स्व. शंकरलाल अग्रवाल उत्कृष्ट वृत्तवाहिनी प्रथम पुरस्कार हरिश मोटघरे, द्वितीय पुरस्कार अभय अग्रवाल, स्वातंत्र्य सैनिक स्व. हिरालाल जैन, उत्कृष्ट विकास वार्ता प्रथम पुरस्कार बिसेन व भरत घासले, द्वितीय पुरस्कार दिलेश्वर पंधराम व भोला गुप्ता, उत्कृष्ट छायाचित्र पुरस्कार शुभम ढोमणे यांना देण्यात आला. सर्वांना स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन अतिथींच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी १० वी १२ वी च्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचाही अतिथींच्या हस्ते गौरव करण्यात आला. पत्रकारांच्या पाल्यांमध्ये हर्षा आर्य, मेमन मोहम्मद यासीम शेख तर १२ वीच्या परीक्षेतील तेजश्री बालपांडे, हरेंद्रजित अरोरा, मीत हरिणखेडे, वैष्णवी शेंडे, श्रेयश वैद्य, ख्याती पलन, प्रांजल राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रमिक पत्रकार संघ गोंदियाच्या सदस्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)