विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा
By Admin | Updated: December 16, 2015 02:04 IST2015-12-16T02:04:43+5:302015-12-16T02:04:43+5:30
आजच्या वैज्ञानिक युगात वावरताना विद्यार्थ्यांनी सत्याच्या कसोटीवर उतरणे अति गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा
धोटे : चमत्कारांवर विश्वास ठेवू नका
बोंडगावदेवी : आजच्या वैज्ञानिक युगात वावरताना विद्यार्थ्यांनी सत्याच्या कसोटीवर उतरणे अति गरजेचे आहे. दैनंदिन जीवनातील कोणत्याही घटनेला कारण असते. त्या कारणाचा शोध घेवून सत्य ओळखण्याची जिज्ञासा अंगी बाळगावे. अज्ञानामुळे काही गोष्टी नकळत घडत असतात. त्याचे दुष्परिणाम म्हणून समाजात जादूटोणा, भानामती, अंगामध्ये देवी संचरणे, यासारख्या विचित्र व चमत्कारिक घटनांवर समाजमन विश्वास ठेवतो. अशा अपप्रवृत्तींच्या बाबींनी आपण अधोगतीकडे वाटचाल करतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे, असे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक डॉ. प्रकाश धोटे यांनी व्यक्त केले.
चान्नाबाक्टी येथील मिलिंद विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालयात कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संस्थापक तथा सेवानिवृत्त प्राचार्य मधू रामटेके होते. अतिथी म्हणून अर्जुनी-मोरगाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. प्रदीप भानसे, प्राचार्य लता मेश्राम, प्रा. गिरिश बोरकर, हेमंत राजगिरे, आर.डब्ल्यू. बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. धोटे पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी भानामती, भूतबाधा या भ्रामक कल्पनांवर कदापी विश्वास ठेवू नये. अंधश्रद्धेच्या आहारी जावू नये, असे सांगत त्यांनी अंधश्रद्धांवर कडाडून प्रहार केला. डॉ. प्रदीप भानसे म्हणाले, भारतीय संविधानातील ५१ (क) कलमाचा आधार घेऊन मूलभूत कर्तव्याविषयी विद्यार्थ्यांनी जागृत राहणे आवश्यक आहे. अंगामध्ये जिद्द, चिकाटी ठेवूनच ध्येयाच्या शिखरापर्यंत मजल गाठणे सहज शक्य आहे, असे ते म्हणाले. सर्वप्रथम संत तुकाराम महाराज, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांसमोर दीप प्रज्ज्वलन व माल्यार्पण करण्यात आले. संचालन जयेश भोवते यांनी केले. आभार प्रा. तारक माटे यांनी मानले. (वार्ताहर)