येथील विद्यार्थी ज्ञानपीठ पुरस्काराचा मानकरी व्हावा!
By Admin | Updated: March 21, 2017 01:00 IST2017-03-21T01:00:36+5:302017-03-21T01:00:36+5:30
गावातील प्रत्येक कुटुंबात स्वच्छतेसाठी डोळसपणे प्रयत्न करुन, शौचालयांचा वापर नियमित करावा.

येथील विद्यार्थी ज्ञानपीठ पुरस्काराचा मानकरी व्हावा!
चंद्रकांत पुलकुंडवार : जिल्हास्तरीय समितीची आढावा सभा
मोहगाव (तिल्ली) : गावातील प्रत्येक कुटुंबात स्वच्छतेसाठी डोळसपणे प्रयत्न करुन, शौचालयांचा वापर नियमित करावा. ग्राम स्वच्छता व निरोपी आयुष्यासाठी स्त्रियांनी देखील पुढाकार घ्यावा. यामध्ये स्त्रियांचे हित आहे. जागोजागी कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी कचराकुंडी, सांडपाण्यासाठी नाल्यांचा वापर व दुरुस्ती करणे, गांडुळखत निर्मितीसाठी शाळेने पुढाकार घ्यावा विद्यार्थ्यांना पर्यावरणस्नेही घडवावे. येथील विद्यार्थी ज्ञानपीठ पुरस्काराचा मानकरी ठरावा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकूंडवार यांनी केले.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीच्या आढावा सभेत रविवारी (दि.२०) ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपायुक्त पापडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.डी. बागडे, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुकाअ आर.ए. देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.बी.निमगुडे, समाजकल्याण अधिकारी एम.आर. रामटेके, गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, पं.स.सदस्य ललीता बहेकार, जेठभावडाचे सरपंच डॉ. जितेंद्र रहांगडाले, जिल्हा पत्रकार संघाचे प्रतिनिधी राधेश्याम शर्मा व इतर उपस्थित होते.
याप्रसंगी मेंढे यांनी, उघड्यावर शौचास बसणाऱ्यास ५०० रुपये दंड ठोठावून याबाबत माहिती देणाऱ्यास ५० रुपयांचे बक्षीस द्यावे. वैयक्तिक व सामुहिक आरोग्य टिकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुन आदर्श ग्राम तयार करावे. मांजरसुद्धा आपल्या पिलांस झाकून ठेवते. अशा प्राण्यांकडून आपण बोध घेणे फार महत्वाचे आहे, कारण आपण बुद्धीजीवी प्राणी आहोत. मुलीच्या लग्नासाठी जैसे पैसे जमवतो तसेच पैसे जमवून ५० हजार रुपयांची मोटार सायकल नाही तर १० हजार रुपयांचा घरी संडास बांधा असे आवाहन त्यांनी केले. आम्ही बलदलो तर जग बदलेल, कोणतेही गाव अस्वच्छ राहणार नाही. पाणीपट्टी व घरकर भरण्यासाठी प्रधान्य द्या असेही त्या म्हणाल्या. दरम्यान सर्व चमूंनी गावात पायी चालत स्वच्छता व शौचालयांची पाहणी केली.
प्रास्ताविक सुरजलाल पटले यांनी मांडले. संचालन पदवीधर शिक्षक अशोक चेपटे यांनी केले. आभार उपशिक्षक अनिल मेश्राम यांनी मानले. याप्रसंगी सरपंच पटले, सदस्य बाबूलाल गौतम, उपसरपंच माया भगत, राधिका पटले, मंजुश्री भगत, हरी पटले, बबीता जांभुळकर, सचिव एल.डी. राऊत, नारायण पटले, तंमुस अध्यक्ष तिलकचंद बोपचे, लोकराम पटले, मुख्याध्यापक बी.सी. वाघमारे, शात्यस अध्यक्ष रामेश्वर बोपचे, सुभाष पटले, रेवालाल गौतम, चुन्नीलाल गौतम, एच.के. धपाडे, एल.के. ठाकरे, प्यारेलला गौतम, लिलेश व कैलाश गौतम यांनी सहकार्य केले.(वार्ताहर)
विद्यार्थ्यांत रमले मुकाअ पुलकुंडवार
भेटीदरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधत मुकाअ पुलकूंडवार त्यांच्यातच रमून गेले. दरम्यान भार्गव गौतम, निशा गौतम, हिना चौधरी यांनी स्वत: रचलेल्या कवितांचे गायन केले. तर पोर्णिमा रहांगडाले व विजय बहेकार याांनी त्यांना विविध प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांत रमलेल्या मुकाअ पुलकूंडवार यांनी पालकांना संबोधित करताना शाळेच्या विकासासाठी सदैव जागृत राहण्याचे आवाहन केले. तसेच निरागस बोलके विद्यार्थी पाहून भारावलेल्या मुकाअंनी स्वत: विद्यार्थ्यांसाठी पुस्तके देण्याचा मनोदय व्यक्त केला.