जबाबदारी न झटकता विद्यार्थ्यांची प्रवेश नोंदणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:32 IST2021-08-24T04:32:42+5:302021-08-24T04:32:42+5:30

गोंदिया : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्रशासनाच्या विसंवादामुळे आणि नागपूर केंद्रित धोरणाचा पगडा पाडण्याच्या हेतूने सुरू असलेल्या बेजबाबदार ...

Students should be admitted without any hesitation | जबाबदारी न झटकता विद्यार्थ्यांची प्रवेश नोंदणी करावी

जबाबदारी न झटकता विद्यार्थ्यांची प्रवेश नोंदणी करावी

गोंदिया : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्रशासनाच्या विसंवादामुळे आणि नागपूर केंद्रित धोरणाचा पगडा पाडण्याच्या हेतूने सुरू असलेल्या बेजबाबदार धोरणांमुळे पदवी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. संभ्रमात टाकणाऱ्या सूचना प्रकाशित करून महाविद्यालय, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना संभ्रमित करण्याचे काम विद्यापीठ करीत आहे.

विद्यार्थ्यांकडून २० रुपये शुल्क आकारून प्रवेश अर्ज नोंदणी करण्याची तारीख गेल्यानंतर महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची नोंदणी करायला लावण्याचे जाहीर पत्र काढून विद्यापीठाने आपली जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे अनेक संभ्रम निर्माण झाल्याने महाविद्यालयासह प्राध्यापक व विद्यार्थी सुद्धा चिंतेत व संभ्रमित आहेत. विद्यापीठाने काढलेल्या पदवी प्रवेश सूचनेनुसार ५ ऑगस्ट ते १८ ऑगस्टपर्यंत पदवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करायची होती. परंतु हा अत्यंत कमी वेळ असल्यामुळे अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी या नोंदणीपासून वंचित राहिले. त्यामुळे २० ऑगस्टला विद्यापीठाने ही तारीख वाढवून देत ५ सप्टेंबरपर्यंत मुभा दिली आहे. परंतु संकेतस्थळावर नोंदणी आधी सारखी सुरू न करता महाविद्यालय स्तरावर नोंदणी करायची असा निर्देश देण्यात आला. त्यामुळे आधी दिलेल्या वेळापत्रकानुसार २४ ऑगस्टला गुणवत्ता यादी जाहीर करायची असल्यामुळे प्राध्यापकांनी किंवा महाविद्यालयांनी कोणते वेळापत्रक ग्राह्य धरायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. ५ सप्टेंबरपर्यंत करण्यात येणारी नोंदणी महाविद्यालयावर ढकलून प्राध्यापकांनी हे काम करायचे का?, असा प्रश्न अनेकांना पडला.

..........

वीस रुपये शुल्क रद्द करावे

अनेक महाविद्यालय विद्यार्थ्यांना नोंदणीच करू देणार नाही व विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होईल अशी भीती आहे. त्यामुळे विद्यापीठाने दुतोंडी भूमिका न घेता स्पष्ट निर्देश देत आधी सुरू असलेली नोंदणी संकेतस्थळावर सुरू करून विद्यार्थ्यांची होणारी धावपळ कमी करावी. नवीन वेळापत्रक जाहीर करावे, विद्यापीठ घेत असलेले वीस रुपये शुल्क रद्द करावे व कोरोना काळातील झालेले नुकसान पाहता सहानुभूती दाखवावी अशी मागणी विदर्भ स्टुडंट अँड युथ ऑर्गनायझेशनचे संयोजक अनिकेत मते यांनी केली आहे.

Web Title: Students should be admitted without any hesitation