स्वयंपाकगृहात शिकणार विद्यार्थी

By Admin | Updated: June 19, 2016 01:33 IST2016-06-19T01:33:47+5:302016-06-19T01:33:47+5:30

जवळील सुरगाव-चापटी येथील जिल्हा प्राथमिक शाळेकडे कुणाचेही लक्ष नाही. निमगाव केंद्रांतर्गत येणारी ही शाळा असून या शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेसे वर्ग नाही

Students learning at the kitchen room | स्वयंपाकगृहात शिकणार विद्यार्थी

स्वयंपाकगृहात शिकणार विद्यार्थी

सुरगाव येथील प्रकार : शिक्षण विभागाचे शाळेकडे दुर्लक्ष
बाराभाटी : जवळील सुरगाव-चापटी येथील जिल्हा प्राथमिक शाळेकडे कुणाचेही लक्ष नाही. निमगाव केंद्रांतर्गत येणारी ही शाळा असून या शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेसे वर्ग नाही म्हणून येथील विद्यार्थी स्वयंपाकगृहात शिकणार असल्याची माहिती आहे.
सदर शाळेत मागील २०१५-१६ सत्रात फक्त तीन विद्यार्थी व एक शिक्षक होते. या सत्रासाठीही एकच शिक्षक येणार असेही समजते. सदर शाळेची इमारत उभी आहे. पण सुसज्ज नसून त्यात दरवाजे व खिडक्या नाहीत. इमारतीचा आतील भाग खूपच खराब असून तेथेच शौच व लघुशंका केल्याचे दिसते. या गावातील लोकसंख्या ५०० जवळपास आहे.
येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहिजे ते शिक्षण मिळत नाही. इमारत अस्वच्छ असून त्यात विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही. शाळेचे कार्यालय कोठे हे सुद्धा समजत नसून शाळेतील कागदपत्रे कोणती हे सुद्धा कळायला मार्ग नाही. असे असतानाही शाळा सुरूच आहे. यातून शिक्षण विभागाचे या शाळेकडे किती लक्ष आहे यातून दिसून पडते. परिणामी काही गावकरी आपले पाल्य बाहेर शिकवितात. शाळा सुधारली नाही तर मुलांची इच्छा अशा शाळेत जायची होणार का? असा प्रश्न विद्यार्थी व पालक करतात.
शिक्षकांचा पगार मिळतो म्हणून ते नोकरी करतात. मग शाळेचे भवितव्य कसेही होऊन जावो, त्याला काय? अशाही शाळा राज्याच्या सामाजिक न्यायमंत्री असलेल्या विधानसभा क्षेत्रात आढळतात. स्वार्थी नेत्यांना कुणाची पर्वा नसते. त्यांना फक्त आपले कार्यच महत्वाचे दिसते यामुळेच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असतानाही कुणाचे या गंभीर प्रकाराकडे लक्ष गेले नाही. (वार्ताहर)

शाळेकडे लक्ष द्या
शाळेत शिकणारे विद्यार्थी म्हणतात आम्हाला निदान अक्षर ओळख होऊ द्या. क,ख,ग, शिकू दया, आमचे हक्क व अधिकारासाठी पाठबळ दया. मात्र ही शाळा की कोंडवाडा असे चित्र इमारतीचे आहे. त्यामुळे शाळा सुधारा, दुरुस्त करा, लक्ष घाला, कानाडोळा करु नका, शिक्षण विभागाने हात घालावे असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Students learning at the kitchen room