विद्यार्थ्यांनो, यशाचे शिखर गाठा
By Admin | Updated: September 10, 2016 00:20 IST2016-09-10T00:20:36+5:302016-09-10T00:20:36+5:30
विद्यार्थ्यांनी जीवनात वेळेला महत्त्व द्यावे. गेलेली वेळ पुन्हा येत नाही. आज मुलांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत.

विद्यार्थ्यांनो, यशाचे शिखर गाठा
उषा मेंढे : प्रगतीसाठी सुविधांचा लाभ घ्या, अनेक मान्यवरांनी केले मार्गदर्शन
गोंदिया : विद्यार्थ्यांनी जीवनात वेळेला महत्त्व द्यावे. गेलेली वेळ पुन्हा येत नाही. आज मुलांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. पूर्वी आजसारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. विद्यार्थ्यांनी उपलब्ध सुविधांचा फायदा घेवून यशाची शिखरे गाठावी, असे आवाहन जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले.
आमगाव तालुक्यातील पद्मपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दत्परविरहित दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, नामदेवराव सूर्यवंशी, सुशीलाबाई सूर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, तहसीलदार साहेबराव राठोड, प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे, सरपंच सीता पाथोडे, उपसरपंच किरणापुरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय ब्राम्हणकर, उपाध्यक्ष गणेश तलमले, शिक्षण विस्तार अधिकारी घोषे, केंद्रप्रमुख रामटेके, रूमटू रिड या मुंबई येथील सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी राज शेखर, सर्व शिक्षा अभियानचे जिल्हा समन्वयक बाळकृष्ण बिसेन, पोलीस निरिक्षक सांडभोर, पत्रकार ओ.बी. डोंगरवार, नरेश रिहले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मेंढे पुढे म्हणाल्या, विविध स्पर्धेच्या बाबतीत ग्रामीण भागातील मुले शहरी भागातील मुलांपेक्षा कमी नाहीत. त्यांना योग्य मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध झाल्या तर ते शहरी भागातील मुलांपेक्षाही पुढे जातील. माणसाच्या जीवनात प्रतिस्पर्धी असेल तर यश नक्की मिळते, असेही मेंढे यावेळी म्हणाल्या.
डॉ. सूर्यवंशी म्हणाले, आयुष्यात ५० ते ६० वर्षे मजेत राहायचे असेल तर विद्यार्थ्यांनी खूप शिकावे. विविध स्पर्धेत सहभागी व्हावे. चुकणे आणि शिकणे हे शाळेतच होते. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीसाठी शिक्षणाचा उपयोग करावा, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. दर महिन्यातून एकदा जिह्यातील वर्ग १ आणि वर्ग २ चे अधिकारी विविध शाळांना भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधून आम्ही कसे घडलो, याबाबतची माहिती प्रेरणा दिनातून देत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना यापासून प्रेरणा मिळत आहे. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये अनेक शैक्षणकि उपक्र म राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी भरपूर खेळावे. तसेच भरपूर अभ्याससुध्दा करावा. आईवडिलांच्या प्रेरणेतून आणि त्यांनी केलेल्या कष्टामुळे आपण या पदापर्यंत पोहोचल्याचे सांगितले. मुलांच्या आयुष्यात यशस्वी होण्यात त्यांच्या गुरूजनांचा मोठा वाटा असतो. त्यांच्या मार्गदर्शनातूनच पुढे जायचे असते असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रगीताने कार्यक्रम सुरू झाले. विद्यार्थी प्रतिनिधींनी परिपाठ सादर केला. सर्व धनापेक्षा विद्याधन हे सर्वश्रेष्ठ धन असल्याचा सूविचार विद्यार्थ्यांनी सांगितला. दिन विशेषाचा उल्लेख करताना जागतिक साक्षरता दिन व दप्तरविरिहत दिन असल्याचे सांगितले. भारत माझा देश आहे, ही प्रतिज्ञा; भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन, माणुसकी ही बोधकथा, आठच्या पाढ्याचे सामूहिक वाचन, सामान्य ज्ञानाच्या प्रश्नावरून ‘सारे जहाँ से अच्छा हिंदूस्ता हमारा’ या गीताचे कवी इकबाल, संगणकाचे संशोधक, भारताची उडान परी, आद्यक्रांतिकारक यावर सामान्य ज्ञानाचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या गटाने उपस्थित विद्यार्थ्यांना विचारले. जवळपास सर्वच प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी दिली. तहसील कार्यालय आमगावच्या वतीने इयत्ता पहिली ते चवथीच्या विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व बिस्कीट देवून करण्यात आले.
कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक एस.एम. उपलपवार, देशमुख, शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले. कार्यक्र माला शाळा व्यवस्थापन समि, ग्रामपंचायत, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ यांचे पदाधिकारी, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार मुख्याध्यापक एस.एम. उपलपवार यांनी मानले.(प्रतिनिधी)
मुलींना खूप शिकवावे
धनाची पेटी असलेल्या मुलींना पालकांनी खूप शिकवावे. आई ही पहिली शिक्षिका असते. बेटी बचाओ-बेटी पढाओ हा संकल्प प्रत्येक पालकांनी केला पाहिजे. वेळेचे महत्व समजून पालकांनी मुलांचा अभ्यास नियमित करावा. शिक्षण हे महत्वाचे धन असून ते कधीच वाया जात नाही. शिक्षण हे महत्वाचे दान आहे. शिक्षकाची नोकरी ही प्रेरणादायी आहे, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आई सुशीला सूर्यवंशी यांनी केले.