पासेस नसल्याने विद्यार्थिंनींचा बसने प्रवास नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:49 IST2021-02-05T07:49:07+5:302021-02-05T07:49:07+5:30
गोंदिया : विद्यार्थिनींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता यावे शाळा दूर असल्यामुळे त्यांच्या शिक्षणात अडचण येऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य ...

पासेस नसल्याने विद्यार्थिंनींचा बसने प्रवास नाही
गोंदिया : विद्यार्थिनींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता यावे शाळा दूर असल्यामुळे त्यांच्या शिक्षणात अडचण येऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मानव विकासच्या बसेस सुरू केल्या आहेत. या बसेसद्वारे विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रवासाची सोय करून देण्यात आली आहे. आता इयत्ता ५ ते १२ पर्यंत शाळा-महाविद्यालय सुरू झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींचे आवागमन सुरू झाले असून, त्यांच्या सेवेत पुन्हा मानव विकासच्या बसेस सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात गोंदिया आगारकडे २८, तिरोडा आगारकडे ७, तर भंडारा जिल्ह्यातील साकोली आगारकडे असलेल्या २१ बसेस जिल्ह्यातील विद्यार्थिनींच्या सोयीसाठी धावतात. यामुळे आता विद्यार्थिनींचे पास तयार करणे सुरू झाले आहे. मात्र काही विद्यार्थिनींचे पास तयार झाले नसल्याने त्या मार्गावर बसेस असूनही विद्यार्थिनी बसने प्रवास करीत नसल्याचे आगाराच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. मागील वर्षी जिल्ह्यात सुमारे २५०० विद्यार्थिनी बसने प्रवास करीत होत्या. यंदा आता शाळा उघडने सुरू असून, ९५४ पासेस तयार करण्यात आल्या आहेत. म्हणजेच आता आणखी विद्यार्थिनी बसने प्रवास करण्यासाठी पासेस तयार करण्याची शक्यता आहे.
---------------------------------
फेऱ्या आहेत मात्र विद्यार्थिनी नाहीत
गोंदिया आगाराकडे असलेल्या चार तालुक्यांसाठी २८ बसेस धावत आहेत. मात्र यामध्ये आमगाव तालुक्यातील चिरचाळबांध, सालेकसा तसेच आमगाव तालुक्यातील ननसरी-मुंडीपार या मार्गावरील बसेस धावत असूनही त्या रिकाम्या येत आहेत. या मागार्वरील विद्यार्थिनींच्या पासेस तयार झाल्या नसल्याने त्या बसने प्रवास करीत नसाव्या अशी शक्यता आहे. यामुळे या मार्गावरील बसेस बंद करण्याची आगारावर पाळी आली आहे.
--------------------------------
गोंदिया आगाराच्या २८ बसेस सुरू
जिल्ह्यात गोंदिया आगाराकडे २८ बसेस असून त्या बसेस धावत आहेत, तर तिरोडा आगाराकडे सात बसेस असून, भंडारा जिल्ह्यातील साकोली आगाराकडे २१ बसेस आहेत. या बसेस धावत आहेत. पूर्वी इयत्ता ९ ते १२ पर्यंत शाळा-महाविद्यालय सुरू करण्यात आले. आता इयत्ता ५ ते ८ पर्यंत शाळा सुरू करण्यात आल्या. त्यामुळे आता विद्यार्थिनींची संख्याही वाढणार आहे.
--------------------
गोंदिया आगारकडे मानव विकासच्या २८ बसेस आहेत. या सर्व बसेस आता विद्यार्थिनींसाठी सुरू आहेत. तसेच मानव विकासच्या बसेससाठी लागणारे पास आता बनविल्या जात आहेत. त्यानुसार विद्यार्थिनींची संख्याही वाढणार.
- संजना पटले
आगार प्रमुख, गोंदिया
--------------------------------
जिल्ह्यात सुरू झालेल्या शाळांची संख्या १०३९
- पाचवी ते आठवी - ३८,६७४
- नववी ते बारावी-४०६३५
---------------------------------------
शाळा सुरू झाल्यानंतर मानव विकासची बस सुरू झाली आहे. मात्र आतापर्यंत आमची पास तयार झालेली नाही. त्यामुळे मी मानव विकासच्या बसने प्रवास करीत नाही. पास तयार झाल्यावर मानव विकासच्या बसनेच प्रवास करून शाळेत ये-जा करणार आहे.
- स्मिता हुकरे, तेढा
---------------------
शाळेत ये-जा करण्यासाठी मानव विकासची बस सुरू आहे. मात्र यासाठी लागणारी पास मी अद्याप तयार केली नाही. पास तयार झाल्यावर मी मानव विकासच्या बसनेच ये-जा करणार आहे.
- पल्लवी डोये, चिरचाळबांध