बारावीच्या परीक्षेत तोतया विद्यार्थी पकडला
By Admin | Updated: February 22, 2015 01:33 IST2015-02-22T01:33:28+5:302015-02-22T01:33:28+5:30
उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (बारावी) पहिल्याच दिवशी देवरी तालुक्यातील डवकी येथील परीक्षा केंद्रावर लहान भावाच्या जागी बीए प्रथम वर्षाला असलेला मोठा भाऊ पेपर सोडविताना आढळला.

बारावीच्या परीक्षेत तोतया विद्यार्थी पकडला
देवरी : उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (बारावी) पहिल्याच दिवशी देवरी तालुक्यातील डवकी येथील परीक्षा केंद्रावर लहान भावाच्या जागी बीए प्रथम वर्षाला असलेला मोठा भाऊ पेपर सोडविताना आढळला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दोघांवरही गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, शनिवारपासून बारावीची परीक्षा सुरू झाली. पहिला पेपर मराठीचा होता. तालुक्यातील डवकी येथील सिद्धार्थ हायस्कूल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय या केंद्रावर सकाळी ११ वाजता पेपरला सुरूवात झाली. यावेळी शंकरलाल अग्रवाल ज्युनियर कॉलेज फुक्कीटोला येथील बारावीचा विद्यार्थी अश्विन भीमराव बोरकर याचे परीक्षा केंद्र सिद्धार्थ हायस्कूल होते. मात्र प्रत्यक्षात ुेुपेपर सोडविण्यासाठी त्याच्याऐवजी त्याचा मोठा भाऊ सचिन भीमराव बोरकर हा गेला.
यासाठी त्याने डुप्लिकेट प्रवेशपत्र बनविल्याचे लक्षात आले. शंका आल्यानंतर अतिरिक्त केंद्र संचालक सोनवाने यांनी हा प्रकार केंद्र संचालक योगेश बोरकर यांच्या लक्षात आणून दिला. त्यांना त्या विद्यार्थ्याची फॉर्म क्र.१ आणि उत्तरपत्रिकेवर सही घेतली. त्यानंतर सचिन बोरकर याने लगेच आपण लहान भावाच्या जागेवर पेपर देत असल्याचे कबुल केले. त्याला देवरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही भावांविरूद्ध भादंवि कलम ४१९, ४२०, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास एपीआय शेळके करीत आहेत. विशेष म्हणजे तोतया परीक्षार्थी बनून आलेल्या सचिनच्या ओळखपत्रावर शंकरलाल अग्रवाल कॉलेजच्या प्राचार्यांनी सही, शिक्का मारून ते कसे अटेस्टेड केले हा चौकशीचा विषय झाला आहे. (प्रतिनिधी)