आश्रमशाळेचे विद्यार्थी सुविधाअभावी आजारी
By Admin | Updated: September 24, 2014 23:37 IST2014-09-24T23:37:19+5:302014-09-24T23:37:19+5:30
सडक अर्जुनी तालुक्यातील शासकिय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत सत्र प्रारंभी पासून वर्ग ११ व १२ च्या विज्ञान शाखेत प्राध्यापक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

आश्रमशाळेचे विद्यार्थी सुविधाअभावी आजारी
शेंडा/कोयलारी : सडक अर्जुनी तालुक्यातील शासकिय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत सत्र प्रारंभी पासून वर्ग ११ व १२ च्या विज्ञान शाखेत प्राध्यापक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वसतिगृहात सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
या शाळेत सत्र सुरु होऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला. तरी सुद्धा विज्ञान शाखेतील वर्ग ११ व १२ च्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक उपलब्ध करुन देण्यात आले नाही. सध्या या परिसरात फक्त शासकिय आश्रम शाळा शेंडा येथे आहे. येथे उच्च माध्यमिक शाळेत विज्ञान शाखा आहे. त्यात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. भावी जीवनाची यशस्वी वाटचाल करण्याचा त्यांचा बेत होता. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षीत व गलथान कारभाराने विद्यार्थ्यांचे भविष्य अधांरात आहे.
शालेय सत्र सुरु होण्याआधी विज्ञान शाखेचे शिक्षक नसताना प्रवेश का? देण्यात आला हा संशोधनाचा विषय आहे. मरणाआधी शरण असा प्रश्न पालक करीत आहेत. विद्यार्थी वारंवार मुख्याध्यापकाला शिक्षकांविषयी विचारणा केल्यावर नुसते आश्वासन दिले जाते. मात्र प्रशासकिय यंत्रणा मूग गिळून गप्प आहे. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विकास विभागाची शासनाने वेगळी स्थापना केली. जेणे करुन आदिवासींचा सर्वांगिण विकास साधता येईल. त्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्ची घालते. परंतु प्रशासकिय यंत्रणा त्यात खिळ घालण्याचे काम करुन त्या योजनांचा बट्याबोळ करीत आहेत. शिक्षणाशिवाय जीवनात दुसरा पर्याय नाही. शाळेला शिक्षकच नाहीत तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय होईल? असा प्रश्न पालकांसमोर आहे.
येथील वस्तिगृहाची परिस्थिती अधिकच बिकट आहे. सिलिंग पंखे धुळखात पडले आहेत. खिडक्या तुटलेल्या आहेत. डासांपासून संरक्षणासाठी मच्छरदाण्या नाही. रात्री-बेरात्री शौचालयास गेले तर लाईटची सोय नाही. सभोवताल झुडपी, कचरा व घाणीचे साम्राज्य असल्याने डासांचे प्रमाण अधिकच वाढले आहे. त्यावर प्रतिबंध उपाय शाळा व्यवस्थापन करीत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
सडक/अर्जुनी तालुक्यात डेंग्यू मलेरीयाची साथ आहे. दल्ली, लेंडीटोला येथील रुग्ण साथीच्यारोगाने दगावले आहेत. याची भनक वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना लागल्यामुळे विद्यार्थी आधिकच धास्तावले आहेत. येथील व्यवस्थापनाच्या गढूळ कारभाराने दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची पटसंख्या निम्यावर आली आहे.
या शाळेत शाळा व्यवस्थापनाने पालक समितीचे गठन केले. परंतु सत्र प्रारंभीपासूनच पालकांची एकही सभा घेतली नसल्याने अनेक शंकाना पेव फुटते. पालक स्वत: मुख्याध्यापकाला पालक समितीची सभा घेण्याविषयी वारंवार विनंती करतात. परंतु मुख्याध्यापक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व आरोग्यापासून कमजोर करण्याचा कट असावा असा संशयही व्यक्त करीत आहेत.
एक आठवड्याच्या आत विज्ञान शाखेचे शिक्षक व वस्तिगृहातील सोई सुविधा उपलब्ध न झाल्यास पालक रस्त्यावर उतरुन शासकिय यंत्रणेला जबाबदार धरुन आपल्या पाल्यांच्या रास्त मागण्या पुर्ण करुन घेतील, असा ईशारा मनोज मरस्कोल्हे, मार्तंड उईके व परतेकी यांनी दिला आहे. यासंदर्भात मुख्याध्यापक बारसागडे यांचे मत जाणून घेण्यासाठी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला असता ते संपर्क क्षेत्राबाहेर होते. (वार्ताहर)