राष्ट्रीय एकता दौडमध्ये धावले विद्यार्थी अन् नागरिकही
By Admin | Updated: November 1, 2014 01:54 IST2014-11-01T01:54:03+5:302014-11-01T01:54:03+5:30
देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती शुक्रवारी ३१ आॅक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली.

राष्ट्रीय एकता दौडमध्ये धावले विद्यार्थी अन् नागरिकही
गोंदिया : देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती शुक्रवारी ३१ आॅक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली. या निमित्ताने राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन सकाळी ९ वाजता गुजराती विद्यालय येथून करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून दौडला हिरवी झेंडी दाखविली. याप्रसंगी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे, पोलीस अधीक्षक शशीकुमार मीणा, उपवनसंरक्षक रामगावकर प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून आयोजित दौडमध्ये राष्ट्रीय एकात्मता व अखंडतेसाठी शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थी, स्काऊट गाईडचे विद्यार्थी, एनसीसीचे छात्रसैनिक आणि नागरिकही धावले.
जिल्हाधिकारी डॉ.सैनी यांनी राष्ट्रीय दौडमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना, अधिकारी, कर्मचारी व शिक्षकगण यांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली. यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, राष्ट्रीय एकता दिनाबरोबरच स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. स्वच्छतेची सुरुवात आपल्या घरापासून करावयाची असून सर्व कार्यालये, शाळा, महाविद्यालय, उद्याने व सर्व ठिकाणी स्वच्छता ठेवणे आपले कर्तव्य आहे. सदैव स्वच्छतेची जाणीव ठेवावी असेही त्यांनी सांगितले.
इंदिरा गांधी स्टेडियम येथे दौडचा समारोप करण्यात आला. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनचरित्राचे कथन शिक्षिका मंजुश्री देशपांडे यांनी केले. देशासाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. यावेळी पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कृष्णा जनबंधू, उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, जिल्हा खनिकर्म अधिकारी जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी गिरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते, उपजिल्हाधिकारी मनकवडे, एन.के. लोणकर, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे, गोंदिया न.प.चे मुख्याधिकारी सुमंत मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी कळमकर, जिल्हा नियोजन अधिकारी बी.के. घाटे तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे सांगता झाली. (जिल्हा प्रतिनिधी)