‘त्या’ विद्यार्थ्याला सोमवारयर्पंत पीसीआर
By Admin | Updated: February 23, 2015 01:59 IST2015-02-23T01:59:05+5:302015-02-23T01:59:05+5:30
धाकट्या भावाच्या जागी बसून पेपर सोडविताना मिळून आलेल्या त्या तोतया विद्यार्थ्याला न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.२३) पोलीस कोठडी सुनावली आहे.

‘त्या’ विद्यार्थ्याला सोमवारयर्पंत पीसीआर
परीक्षा व केंद्रावर प्रश्नचिन्ह : भरारी पथकाने नजर ठेवण्याची मागणी
देवरी : धाकट्या भावाच्या जागी बसून पेपर सोडविताना मिळून आलेल्या त्या तोतया विद्यार्थ्याला न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.२३) पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी त्याला २२ फेब्रुवारी रोजी गोंदियातील न्यायालयात हजर केले होते. विशेष म्हणजे या प्रकारानंतर नागपूर बोर्डाद्वारे घेण्यात येत असलेल्या १२ वीच्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या परीक्षा केंद्रावर संशय व्यक्त केला जात आहे.
उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील डवकी येथील सिद्धार्थ हायस्कुल (केंद्र क्रमांक ७६२) मध्ये सचिन भीमराव बोरकर हा तोतया विद्यार्थी बनून परीक्षा देत होता. शंकरलाल अग्रवाल कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी अश्विन भीमराव बोरकर हा मुंबईला गेला असून आपल्या धाकट्या भावाच्या जागी सचिन पेपर सोडवीत असताना अतिरिक्त केंद्र संचालकांनी सचिनला रंगेहात पकडले होते. या प्रकारामुळे अवघ्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. अटक करण्यात आलेल्या सचिनला पोलिसांनी गोंदियातील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शेंडके करीत आहेत.
विशेष म्हणजे या परीक्षा केंद्राला दोन वर्षापुर्वीच केंद्राची मान्यता मिळाली आहे. अगोदर या शाळेचे विद्यार्थी पुराडा येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा देत होते. परंतु दोन वर्षापुर्वी पुराडा केंद्राची मान्यता रद्द करण्यात आली असून त्या ठिकाणी सिद्धार्थ हायस्कुलला मान्यता देण्यात आली. सध्या या केंद्रावर पुराडा, डोंगरगाव मुरदोली, डवकी व फुक्कीमेटा या गावातील महाविद्यालयातील विद्यार्थी परीक्षा देत आहेत. विशेष म्हणजे या केंद्राचे केंद्र संचालक योगेश बाबुराव बोरकर हे सिद्धार्थ हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात व्याख्याता असून सचिनचे नातेवाईक असल्याचे बोलले जात आहे. एवढी गंभीर बाब केंद्र संचालकांच्या लक्षात का आली नाही, हा चौकशीचा विषय असू शकतो. मात्र ही बाब केंद्र अतिरिक्त केंद्र संचालक सोनवाने यांच्या लक्षात आली. यातही विशेष म्हणजे सचिनचे विद्यार्थी प्रवेशपत्र बनले कसे याची चौकशी व्हायला पाहिजे.
मागील वर्षीपासून सुरु झालेल्या या केंद्राचे हे दुसरे वर्ष असून मागील वर्षी दोन विद्यार्थ्यांना रस्टीकेट करण्यात आले होते. तर यंदा पहिल्याच दिवशी हा प्रकार घडल्याने या केंद्रावर आता बोर्डाचे अधिकारी किती लक्ष देणार व या कें्रदावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्य म्हणजे या केंद्रावर पास होण्याची हमखास हमी मिळत असल्याने येथील कित्येक विद्यार्थी गावातील नामांकित शाळा सोडून येथून ३ किमी. अंतरावर असलेल्या सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालयात शिकायला जातात. अशात बोर्डाच्या भरारी पथकाने या केंद्रावर करडी नजर ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)