ट्रॅक्टर अपघातात विद्यार्थी ठार, दोघे जखमी
By Admin | Updated: March 8, 2015 01:10 IST2015-03-08T01:10:51+5:302015-03-08T01:10:51+5:30
बाक्टी-चान्ना येथील गाव तलावाजवळ झालेल्या ट्रॅक्टर अपघातामध्ये एक शाळकरी विद्यार्थी मृत्युमुखी पडला, तर दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.

ट्रॅक्टर अपघातात विद्यार्थी ठार, दोघे जखमी
बोंडगावदेवी : बाक्टी-चान्ना येथील गाव तलावाजवळ झालेल्या ट्रॅक्टर अपघातामध्ये एक शाळकरी विद्यार्थी मृत्युमुखी पडला, तर दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. हा अपघात शनिवारी (दि.७) सकाळी ९.३० वाजतादरम्यान घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या दहावीचे पेपर सुरू असल्याने विद्यार्थ्यांची सकाळ पाळीमध्ये शाळा असते. चान्ना बाक्टी येथील मिलिंंद विद्यालयात येरंडी/देवी येथील विक्रम शिवचरण बहेकार (१३) हा इयत्ता सातवीमध्ये शिकत होता. सकाळपाळीची शाळा करुन तो ९.३० वाजता गावाला जाण्यासाठी सायकलीने चान्नामार्गे निघाला होता. घटनास्थळी पिंपळगाव/खांबी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे दोन विद्यार्थी पुलावर बसले होते. त्याचक्षणी चान्ना येथील सोनवाने ठेकेदाराचा भरतीचा ट्रॅक्टर वेगाने आला. त्यात विक्रम बहेकार हा विद्यार्थी ट्रालीच्या मागच्या चाकात दबून गेला. येरंडी-देऊळगाव येथील लोकेश कोवे (१५), टायसन रंगारी (१६) या दोघांना सुद्धा मार लागला.
गावकऱ्यांनी लगेच तिघांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. गंभीर अवस्थेत असलेल्या विक्रमला प्राथमिक उपचार करून रूग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने खासगी गाडीने साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दोन विद्यार्थ्यांवर चान्ना पीएचसीमध्ये डॉ.शिरसाट यांनी औषधोपचार करुन सुटी दिली.
चान्ना येथील एका सोनवाने नामक ठेकेदाराचा ट्रॅक्टर एम.एच. ३५ जी ४२७२, ट्रॉली एमएच ३५ एफ १९५० होता. त्यात भागवत लोगडे, सदाशिव पुराम, देवचंद लोगडे हे मजूर ट्रॅक्टरमध्ये बसले होते. घटनेची माहिती मिळताच अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि राजेश गज्जल, महेंद्र पुण्यप्रेडीवार, इंद्रपाल कोडापे, दिवाकर शहारे व अन्य पोलीस घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
पुढील तपास ठाणेदार अभिषेक पाटील, सपोनि राजेश गज्जल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार इंद्रपाल कोडापे करीत आहेत. (वार्ताहर)