विद्यार्थी धडकले जिल्हा परिषदेत
By Admin | Updated: September 11, 2015 00:56 IST2015-09-11T00:56:00+5:302015-09-11T00:56:00+5:30
मोहाडी येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात ११ वी व १२ वीसाठी भौतिक शास्त्र विषयाच्या शिक्षकाच्या मागणीसाठी ४० विद्यार्थी जिल्हा परिषदेत धडकले.

विद्यार्थी धडकले जिल्हा परिषदेत
भंडारा : मोहाडी येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात ११ वी व १२ वीसाठी भौतिक शास्त्र विषयाच्या शिक्षकाच्या मागणीसाठी ४० विद्यार्थी जिल्हा परिषदेत धडकले. याची दखल घेत तुमसरचे आमदार चरण वाघमारे, शिक्षण सभापती राजेश डोंगरे यांनी मार्ग काढून दोन दिवसात शिक्षक मिळणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थी परतले.
आज गुरुवारला दुपारी ४ वाजताच्या सुमारास मोहाडी शाळेतील ४० विद्यार्थी जिल्हा परिषदेत पोहोचले. भौतिक शास्त्र विषयासाठी शिक्षक पाहिजे, एवढीच या विद्यार्थ्यांची मागणी होती. मागील अनेक दिवसांपासून या शाळेत शिक्षक नाही. त्यामुळे त्याचा शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले. परंतु त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. गुरुवारला मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांना भेटून समस्या सांगण्यासाठी हे विद्यार्थी आले होते. याची माहिती होताच आमदार चरण वाघमारे यांनी शिक्षण सभापती राजेश डोंगरे यांच्याशी चर्चा केली.
यावेळी त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना बोलावून लालबहाद्दूर शास्त्री विद्यालयात भौतिक शास्त्र विषयाचे दोन शिक्षक असल्यामुळे त्यापैकी एक शिक्षक मोहाडीत देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसात शिक्षक देण्यात येईल, या आश्वासनानंतर विद्यार्थी घरी परतले.
(जिल्हा प्रतिनिधी)