८०० मीटर रस्त्यासाठी ५० वर्षांपासून संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 21:39 IST2017-09-01T21:39:32+5:302017-09-01T21:39:54+5:30

८०० मीटर रस्त्यासाठी ५० वर्षांपासून संघर्ष
विजय मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : सालेकसा आणि आमगाव या दोन तालुक्यांना जोडणारा धानोली बाम्हणी मार्ग रेल्वेच्या हद्दीत काही प्रमाणात येतो. त्यामुळे ८०० मीटर रस्ता बनविण्यासाठी धानोली परिसरातील आठ ते दहा गावचे लोक मागील ५० वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. पण प्रशासनाला अद्यापही पाझर फुटला नसल्याने त्यांचा संघर्ष कायम आहे.
सालेकसा तालुक्यातील धानोली व आमगाव तालुक्यातील बाम्हणी (बोरकन्हार) या दोन गावांच्या मधातून वाघनदी वाहते. ही नदी दोन्ही तालुक्याच्या सीमेवरुन वाहते. या नदीच्या पलिकडे धानोलीवरुन जवळपास चार किमी अंतर पार केल्यावर बाम्हणी गावात पोहोचल्यास आमगावच्या बाजारपेठेत जाणे एकदम सोयीचे ठरते. त्यामुळे धानोली आणि बाम्हणी परिसरातील गावकरी मागील ५० वर्षांपासून पक्का रस्ता तयार करुन देण्याची मागणी करीत आहेत. मात्र प्रशासनाने त्यांच्या मागणीची अद्यापही दखल घेतली नाही. परिणामी या परिसरातील गावकºयांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
रस्ता नसल्याने लोक वाघनदीवरुन रुळावरुन येण्याची घाई करतात. त्यामुळे केव्हाही येथे मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जवळपास ३०० मीटर अंतर पार करेपर्यंत दोन्ही बाजूने रेल्वे गाडी आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे दरवर्षी दोन-चार लोकांचा यात बळी जातो. हाच धोका ओळखून धानोली, बाम्हणी परिसरातील गावकºयांनी पक्का रस्ता तयार करण्याची मागणी केली आहे.
वीस वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने धानोली-बाम्हणी मार्गाचे खडीकरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु बिलासपूर झोन अंतर्गत रेल्वे अधिकारी यांनी ऐन बांधकाम सुरु होण्यापूर्वी येथे येऊन काम थांबविले. हा मार्ग रेल्वेच्या हद्दीत असून या जागेवरुन रस्ता तयार करता येणार नसल्याचे सांगत काम बंद पाडले. तेव्हापासून रस्त्याचे काम रखडले.
मागील वर्षी या शिष्टमंडळाने खा. अशोक नेते यांच्यासह नागपूर रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे व्यथा मांडली. तेव्हा त्यांनी गोंदियाच्या जिल्हा जिल्हाधिकारीमार्फत प्रस्ताव पाठविण्याचा सल्ला दिला. तेव्हा शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊन आपली अडचण सविस्तर मांडली. दरम्यान जिल्हाधिकारी बदलत गेले. मात्र धानोली बाम्हणी रस्त्याची समस्या कायम आहे.
विद्यमान लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा
५० वर्षे लोटूनही ८०० मीटरच्या रस्त्याची समस्या मार्गी लागली नाही. या क्षेत्राचे आ. संजय पुराम यांनी काही दिवसांपूर्वीच धानोली गावाला भेट दिली . तेव्हा गावकºयांनी एकत्र येत धानोली, बाम्हणी रस्त्याची समस्या आधी मार्गी लावण्याची मागणी केली. धानोली, बाम्हणी दरम्यान वाघ नदीवर युती शासनाच्या काळात एक कोल्हापुरी बंधारा तयार करण्यात आला होता. ही समस्या लक्षात घेता विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
लोकप्रतिनिधींचे केवळ आश्वासन
या परिसरातील गावकºयांनी अनेकदा या भागातील खासदार, आमदार यांच्याकडे रस्त्याची समस्या मांडून ती मार्गी लावण्याची मागणी केली. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबिले. त्यानंतर गावकºयांच्या शिष्टमंडळाने रेल्वे अधिकारी व जिल्हा प्रशासनाची भेट घेवून रस्त्याची समस्या मार्गी लावण्याची मागणी केली.
सात गावांना होणार फायदा
धानोली-बाम्हणी पक्का रस्ता व वाघ नदीवर पुलाची निर्मिती झाल्यास आमगाव व सालेकसा येथील लोकांना कमी कमीत वेळात आपला प्रवास करता येईल. यात सालेकसा तालुक्यातील धानोली, दरबडा, नानव्हा, बोदलबोडी, गिरोला, तिरखेडी परिसरातील जवळपास २२ हजार लोकांना लाभ होईल.