मतभेद विसरून पक्ष संघटन मजबूत करा
By Admin | Updated: September 12, 2016 00:28 IST2016-09-12T00:28:30+5:302016-09-12T00:28:30+5:30
काँग्रेस पक्ष गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक व सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे. आम्ही ज्या गावात सभा घेतो त्या सभेत पक्षातील कार्यकर्तांना

मतभेद विसरून पक्ष संघटन मजबूत करा
कोरोटे : तालुका कार्यकर्ता मेळावा, अनेकांचा काँग्रेस प्रवेश
देवरी : काँग्रेस पक्ष गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक व सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे. आम्ही ज्या गावात सभा घेतो त्या सभेत पक्षातील कार्यकर्तांना काँग्रेस पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आहे, असे सांगतो. या पक्षाने ६० वर्षात या देशात विविध विकास कामे केलीत. यात कॅम्प्युटर आणि मोबाईल टेक्नालॉजी स्व. राजीव गांधी यांनी आपल्या देशात आणून आधुनिक क्रांतीला सुरूवात केली. येणाऱ्या दिवसांत अनेक निवडणुका येतील. या निवडणुकीत जर प्रत्येक कार्यकर्त्याने आपसातील मतभेद विसरून पक्ष संगठन मजबूत करण्याचे काम केले तर कोणत्याही निवडणुकीत यश संपादन करणे अवघड जाणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केला.
ते देवरी येथील श्री अग्रसेन भवनात जिल्हा काँग्रेसच्या आदिवासी सेलचे नवनियुक्त माजी आ. रामरतन राऊत यांनी आयोजित केलेल्या तालुका कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदिवासी सेलचे प्रतिनिधी तथा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. नामदेवराव किरसान होते. याप्रसंगी प्रामुख्याने जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पुरूषोत्तम बाबा कटरे, जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, माजी जि.प. अध्यक्ष टोलसिंगभाऊ पवार, जि.प. सभापती पी.जी. कटरे, देवरी तालुक्याचे प्रभारी राजेश नंदागवळी, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, आमगाव तालुका अध्यक्ष धीरेश पटेल, आदिवासी विकास महामंडळाचे संचालन भरतसिंग दुधनाग, जि.प. सदस्य माधुरी कुंभरे, दीपकसिंग पवार, पं.स. उपसभापती संगीता भेलावे, नगर पंचायतचे उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, पं.स. सदस्य लखनी सलामे, राधेश्याम बगडीया, उपाध्यक्ष चैनसिंग मडावी, उत्तम मरकाम, माणीक भंडारी, जगत नेताम, मानिकबापू आचले, बळीराम कोटवार, धनपत भोयर, मोतीराम सयाम, तालुकाध्यक्ष संदीप भाटीया, तालुका युवक अध्यक्ष शकील कुरैशी, आमगाव विधानसभा अध्यक्ष अविनाश टेंभरे, जीवन सलामे, प्रभाकर कोल्हारे, जैपाल शहारे, जिते भाटीया, दिलीप संगीडवार, माणीकबापू आचले व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
कोरोटे पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाने या देशातील गोरगरीब व सर्वसामान्य लोकांकरिता अनेक विकासाच्या योजना राबवून या देशाला प्रगती पथावर नेण्याचे काम केले. या सर्व गोष्टी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन लोकांंना सांगावे. त्यांची समस्या विचारून त्याचे निराकरण करण्यासाठी निवेदन व मोर्च्याचे माध्यमातून पूर्ण करण्याचे प्रयत्न करावे, असे ते म्हणाले.
प्रास्ताविकातून नवनियुक्त आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष माजी आ. रामरतन राऊत यांनी सांगितले, सन २०१४ मध्ये राज्यातील आदिवासी व गैरआदिवासी गोरगरीब लोकांकरिता वनहक्कात निस्ताराचे अधिकार आघाडी सरकारने मंजूर केले होते. परंतु आता राज्यातील युती सरकारने सदर नियम व अधिकार रद्द केले. यात येथील लोकांवर फार मोठ्या प्रमाणावर अन्याय झाल्याची व्यथा त्यांनी सांगितली.
मेळाव्यात इतर मान्यवरांनीसुद्धा मार्गदर्शन करून सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्षाचे काम केले तर पुन्हा सत्ता मिळविण्यात नक्कीच यश मिळेल, अशी आशा व्यक्त केली. दरम्यान नवनियुक्त तालुकाध्यक्ष संदीप भाटीया आणि माजी आ. रामरतन राऊत यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी भाजप पक्षात २५ वर्षापासून सक्रियपणे कार्य करणारे निलजचे धनुलाल उईके यांनी तसेच त्यांच्या सोबत पिंडकेपार, फुटाणा, गोटाबोडी व देवरी ग्रा.पं.चे पदाधिकारी व महिला अशा ३० कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकून काँग्रेसचे ध्येयधोरण व पक्ष नेतृत्व स्वीकारून पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे अतिथीच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
संचालन माजी उपसभापती इंदल अरकरा यांनी केले. आभार माजी सभापती वसंत पुराम यांनी मानले. (प्रतिनिधी)
७ आॅक्टोबरला धडक मोर्चा
सत्ताधारी पक्ष निवडणुकीत लोकांना खोटे आश्वासन देऊन आणि अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेवर पोहचले. आता दोन वर्षाचा कार्यकाळ लोटूनसुध्दा कोणत्याही विकासाच्या योजना न राबविता लोकांना भ्रमित करण्याचे काम ते करीत आहेत. जिल्ह्यातील ६८ गावे दुष्काळ घोषित करूनसुध्दा आतापर्यंत एकही शेतकऱ्याला दुष्काळ निधी मिळालेला नाही. अशा अनेक लोकांच्या समस्यांना घेवून येत्या ७ आॅक्टोबर रोजी देवरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्च्याच्या यशस्वितेसाठी परिसरातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकांना सहभागी करावे, असे आवाहन सहषराम कोरोटे यांनी केले.