आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या शिक्षकाला कठोर शिक्षा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:29 IST2021-03-31T04:29:12+5:302021-03-31T04:29:12+5:30
गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील ग्राम कुऱ्हाडी येथील ग्रामविकास अधिकाऱ्याचा मानसिक छळ करणाऱ्या सरपंच पती असलेल्या शिक्षकाला कठोर शिक्षा करा, ...

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या शिक्षकाला कठोर शिक्षा करा
गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील ग्राम कुऱ्हाडी येथील ग्रामविकास अधिकाऱ्याचा मानसिक छळ करणाऱ्या सरपंच पती असलेल्या शिक्षकाला कठोर शिक्षा करा, अशी मागणी करीत आता ग्रामसेवक संघटना पुढे आली आहे. पोलिसांनी आरोपीवर भा.दं.वि.च्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
कुऱ्हाडी ग्रामपंचायत येथील ग्रामविकास अधिकारी एस.सी. राहंगडाले यांना सरपंच अलका पारधी यांचे पती मार्तंड बाबूराव पारधी (प्राथमिक शिक्षक जि.प.) हे नियमबाह्यपणे कामकाजात हस्तक्षेप करून नियमबाह्य कामे करण्यास ग्रामसेवकाला भाग पडण्याचा प्रयत्न करीत होते. या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी पत्रात लिहिले आहे. मार्तंड पारधी स्वतः शिक्षक पदावर कार्यरत असूनही ग्रामपंचायत कामात हस्तक्षेप करून अनधिकृत काम करणे, ठेकेदारी करणे, स्वतः साहित्य खरेदी करणे, कामे करून बिले काढण्यासाठी दबाव आणत होता. या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करीत असल्याचे रहागंडाले यांनी चिठ्ठीत उल्लेख केला आहे. यामुळे पारधी याला कठोर शिक्षा करण्याची मागणी ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन, मानद अध्यक्ष कार्तिक चव्हाण, सचिव दयानंद फटिंग, सचिन कुथे, कविता बागडे, एल.आर. ठाकरे, सुनील पटले, सुरेश वाघमारे, ओ.के. रहांडागले, सुषमा वाढई, सुभाष सिरसाम, रामेश्वर जमईवार व इतरांनी केली आहे.