गोंदिया शहरातील ९१ गणेश मंडळांना कडक सुरक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:29 IST2021-09-11T04:29:23+5:302021-09-11T04:29:23+5:30
गोंदिया : रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३४ आणि गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५७ अशा एकूण ९१ गणेशोत्सव ...

गोंदिया शहरातील ९१ गणेश मंडळांना कडक सुरक्षा
गोंदिया : रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३४ आणि गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५७ अशा एकूण ९१ गणेशोत्सव मंडळांची कडक सुरक्षा करण्यासाठी पोलिसांनी बॉम्ब शोध व नाशक पथक तैनात केले आहे. हे पथक गणेश मंडपांना भेट देऊन त्यांची कसून तपासणी करीत आहे. दानपेटीत समाजकंटकांकडून घातपाताच्या हेतूने कोणतीही स्फोटक वस्तू घातली जाणार नाही, याकरिता दानपेटीवर लक्ष ठेवण्यासाठी चाणाक्ष स्वयंसेवक ठेवावेत अशा सूचना पोलिसांनी गणेश उत्सव मंडळांना देखील दिल्या आहेत.
गणेश मंडळाची धर्मादाय आयुक्तांकडून नोंदणी करून घ्यावी. आपल्या मंडळातर्फे उभारण्यात आलेल्या मंडळामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, पावसाचे पाणी मूर्तीवर पडणार नाही याची काळजी घ्यावी, मूर्तीच्या सुरक्षेसाठी २४ तास स्वयंसेवकाची नेमणूक करावी. वीज विभागाच्या परवानगीशिवाय किंवा खांबावरून थेट वीजपुरवठा घेऊ नये. मंडळामध्ये सजावटीकरिता करण्यात आलेल्या वीज रोषणाईची उंची जास्त ठेवावी, मंडळाचे देखावे व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पुरुष व महिला अशा वेगवेगळ्या रांगाची व्यवस्था ठेवावी, मंडपात आग विझविण्याचे साधन (फायर एस्टिग्वीशर) ठेवावे, मंडपात अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटर ठेवावे. गणेश मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये इतर धर्मीयांच्या भावना दुखावतील असे कार्यक्रम घेऊ नयेत अशा विविध सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गांधी प्रतिमा येथील श्री शिवाजी गणेश उत्सव मंडळाच्या मंडपाची तपासणी पोलिसांनी केली. मेटल डिटेक्टर व श्वानपथकासह पोलीस कर्मचारी तेथे दाखल झाले होते. रामनगर व शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ९१ सार्वजनिक गणेश मंडळांची कसून तपासणी केली जात आहे.