अटकेने निवळला तणाव
By Admin | Updated: March 20, 2015 00:53 IST2015-03-20T00:53:31+5:302015-03-20T00:53:31+5:30
माजी नगर परिषद उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पंकज यादव यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना अखेर बुधवारच्या ..

अटकेने निवळला तणाव
गोंदिया : माजी नगर परिषद उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पंकज यादव यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना अखेर बुधवारच्या सायंकाळी अटक करण्यात आली. त्यामुळे शहरात मंगळवारी सायंकाळपासून निर्माण झालेला तणाव आणि दहशतीचे वातावरण गुरूवारी निवळले. बाजारपेठही पूर्ववत सुरू झाली. मात्र शहरात पोलीस बंदोबस्त कायम होता.
अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्या दोघांनाही देवरी पोलीस ठाण्यात हलविण्यात आले आहे.
येथील नगरसेवक यादव यांच्यावर नगर परिषद कार्यालय परिसरात दोघांनी दीवघेणा हल्ला करून त्यांना जखमी केले. १७ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजतादरम्यान घडलेल्या या घटनेनंतर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यांनतर यादव यांच्या समर्थकांनी शहरातील बाजारपेठ बंद पाडून आपला रोष व्यक्त केला. १८ मार्च रोजी सकाळी शहर पोलीस ठाण्यात गोंधळ घालून हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. या घटनेचे पडसाद बुधवारीही दिसून आले. त्यामुळेच बाजारपेठ पुन्हा दिवसभरापासाठी बंद झाली होती.
दरम्यान बुधवारी रात्री १०.१५ वाजता यादव यांच्यावर हल्ला करणाऱ्या कुणाल महावत (२१) व राजेश तांडेकर (२०,रा.सावराटोली) यांना पोलिसांनी अटक केली. गुरूवारी (दि.१९) दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी दोघांना देवरी पोलीस स्टेशनला हलविले आहे. (शहर प्रतिनिधी)