दिवसाही सुरू असतात पथदिवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:22 IST2021-05-28T04:22:24+5:302021-05-28T04:22:24+5:30
सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक खातिया : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. विद्युत प्रवाहाचा ...

दिवसाही सुरू असतात पथदिवे
सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक
खातिया : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे धोका होऊ शकतो.
बँकेत दलालांमार्फत सर्वसामान्यांची लूट
तिरोडा : तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तात्काळ होत असल्याने सर्वसामान्यांना फटका बसत आहे.
चांदोरी खुर्द रस्ता अपघाताला आमंत्रण
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील पिपरिया चांदोरी खुर्द-खैरलांजी पिपरिया रस्ता खराब झाल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी केली जात आहे.
तंटामुक्त गाव अभियान नावापुरतेच
सडक अर्जुनी : राज्य शासनाच्या तंटामुक्त गाव अभियान योजनेला गावागावातील राजकीय गटबाजी आणि अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांमुळे ग्रहण लागल्याने या अभिनव योजनेचा फज्जा उडाला आहे.
भटक्या समाजाची समस्या संपता संपेना
आमगाव : पोटाची खळगी भरण्यासाठी ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ या म्हणीप्रमाणे लोहार समाज भटकंती करून आपल्या संसाराचा गाडा हाकत आहे. यासाठी गावोगावी फिरून मिळालेल्या पैशातून ते आपला उदरनिर्वाह करतात.
घरकूल अनुदान पद्धतीत बदल करा
गोरेगाव : बेघर कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते; परंतु अनुदान देण्याची जाचक अट असल्यामुळे लाभार्थींची आर्थिक कोंडी होते. कित्येकांना अनुदान मिळण्यास उशीर होतो. यामुळे लाभार्थी कर्जबाजारी होतो. अनुदान देण्याच्या पद्धतीत बदल करण्याची मागणी लाभार्थींनी केली आहे.
बसस्थानक ठरत आहे शोभेची वास्तू
गोरेगाव : शहरात १०-१२ वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून बसस्थानकाची निर्मिती करण्यात आली. या बसस्थानकावर आजघडीला कुणीही कर्मचारी राहत नाही. तसेच गोरेगावमार्गे जाणाऱ्या बस या बसस्थानकावर थांबत नाहीत. त्यामुळे बसस्थानकावर बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. लाखो रुपये खर्च करून बांधलेला प्रवासी निवारा शोभेची वास्तू ठरत आहे.
ग्राम सडक योजनेच्या रस्त्यांची दुरवस्था
तिरोडा : तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्यांची निर्मिती व डांबरीकरणाचे काम करण्यात आले; परंतु यापैकी अनेक रस्त्यांची अल्पावधीतच दुरवस्था झाली आहे. यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा या रस्त्यांच्या दुरुस्तीची पुन्हा गरज असून तशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
नेटवर्कअभावी नागरिक झाले त्रस्त
देवरी : विविध शासकीय कार्यालयातील कामकाजांसह खासगी कंपनी कार्यालयातील कामे ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे मोबाइलचा वापरही वाढला आहे. मात्र, आता नेटवर्कअभावी नागरिक त्रस्त झाले आहेत. ही समस्या गत आठ ते दहा वर्षांपासूनची आहे. दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
कार्यालयातून तक्रार पेट्या गायब
आमगाव : शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या कार्य पद्धतीबद्दल अनेक तक्रारी असतात. या हेतूने शासकीय कार्यालयात तक्रार पेट्या लटकविलेल्या दिसायच्या. मात्र, आता कार्यालयातून या तक्रार पेट्या गायब झाल्याचे दिसते.