बोदरा गावाला वादळीवाऱ्याचा तडाखा

By Admin | Updated: September 8, 2014 00:34 IST2014-09-08T00:34:15+5:302014-09-08T00:34:15+5:30

परिसरात रविवारी (दि.७) सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. पाऊस सुरू असताना एकाएकीच दुपारी १२ वाजतादरम्यान भयंकर स्फोटासारखा आवाज होऊन वादळीवाऱ्या जबरदस्त तडाखा बोदरा गावाला बसला.

Storm hit Bodra village | बोदरा गावाला वादळीवाऱ्याचा तडाखा

बोदरा गावाला वादळीवाऱ्याचा तडाखा

बोंडगावदेवी : परिसरात रविवारी (दि.७) सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. पाऊस सुरू असताना एकाएकीच दुपारी १२ वाजतादरम्यान भयंकर स्फोटासारखा आवाज होऊन वादळीवाऱ्या जबरदस्त तडाखा बोदरा गावाला बसला. यात गावातील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झाडांची पडझड होऊन विद्युत तारा तुटल्या. मात्र जीवित हानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळपासूनच पावसाने कहर केला. बोदरा गावाच्या शेजारीच असलेल्या उटखाळा या तलावातून ज्वालासारख्या दिसणारा गोळा निर्माण होऊन चक्रीवादळाने बोदरा गावावर कहर केला. यात मोठी झाडे मुळासकट घरांवर कोसळली. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील फायबर व टिनाच्या पत्र्यांद्वारे बनविलेले किचनशेड पूर्णत: भुईसपाट होऊन दूरवर फेकल्या गेले. तसेच समाज मंदिरावरील टिनचे शेड बऱ्याच लांब अंतरावर फेकल्या गेले. याशिवाय भाऊराव राऊत यांच्या घरावर झाड पडून त्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याचे समजते. तर या वादळीवाऱ्यामुळे यामध्ये भाऊराव राऊत, तेजराम कांबळे, प्रभू राऊत, भाष्कर शहारे, केशव चौधरी, रेशीम चौधरी, जयदेव चौधरी, योगीराज चौधरी, शालू कांबळे, सदाशिव कांबळे, भागवत लंजे, अशोक लंजे, तुलाराम कांबळे, दुधराम कांबळे यांच्यासह २८ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
चक्रीवादळाची माहिती मिळताच सरपंच जयवंता झोळे, उपसरपंच माधोराव झोळे, पो.पा. नाशिक कापगते, पं.स. सदस्य प्रमोद पाऊलझगडे, राजू पालीवाल, पोलिस निरीक्षक संदीप भागवत, तलाठी यु.एस. बागधरे यांनी नुकसानीची पाहणी केली.
झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. एन.एच. टेंभरे, राठोड, विनोद बनकर, आनंदराव चौधरी यांनी क्षतिग्रस्त घरांची पाहणी केली. चक्रीवादळाने झालेल्या नुकसानग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. (वार्ताहर)

Web Title: Storm hit Bodra village