रेतीचा अवैध उपसा थांबवा
By Admin | Updated: April 19, 2017 00:18 IST2017-04-19T00:18:17+5:302017-04-19T00:18:17+5:30
सौंदड येथील चालू रेती घाटावर रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. हा प्रकार त्वरित थांबविण्यात यावा,

रेतीचा अवैध उपसा थांबवा
तहसीलदारांना निवेदन : २० ते २५ ट्रॅक्टर रेतीचा रोजच उपसा
सौंदड :सौंदड येथील चालू रेती घाटावर रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. हा प्रकार त्वरित थांबविण्यात यावा, यासाठी शेतकऱ्यांनी सडक-अर्जुनीच्या तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
सौंदड येथील चालू रेती घाट कंट्राटदाराने २० लाखात विकत घेतले. मात्र सदर घाटामधून रेती साठा न नेता घाटापासून अर्धा किमी अंतरावरील घाटातून मोठ्या प्रमाणात दर्जेदार रेतीसाठा असल्याने तेथून नेले जात आहे. सदर कंत्राटदार दगडी चट्टान जवळील जागेतून जवळपास २० ते २५ ट्रॅक्टर रेतीचा रोजच उपसा करीत आहे. एका रॉयल्टीवर दहा ट्रिप रेती नेली जाते. त्यामुळे कंत्राटदाराने सीमा ओलांडल्याचे दिसून येत आहे.
माहितीनुसार, दिलेल्या जागेतूनच सदर कंत्राटदार रेती नेवू शकतो. जेवढ्या ट्रीपची रॉयल्टी दिली जाते, तेवढीच नियमाने रेतीचा उपसा करणे अपेक्षित असते. तर नदी पात्रातून रेती उत्खननही जवळपास दोन फूट इतकेच खोल करावे लागते. मात्र सदर कंत्राटदाराने दिलेल्या जागेतून रेतीचा उपसा केलाच, पण ज्या ठिकाणी दर्जेदार साठा आहे तिथेपण हाथ साफ केले.
जवळील शेतकरी जयपाल मारवाडे यांनी कंत्राटदारांना सदर जागेतून वाळू नेण्यास नकार दिला. यावर त्याने शेतकऱ्याशी अरेरावीपणाच्या भाषेत उत्तर दिले. हा सर्व प्रकार जवळपास तीन महिन्यांच्या पूर्वीपासून चुलबंद नदीमध्ये घडत आहेत. सदर कंत्राटदाराने या ठिकाणी प्रत्येक वर्षी उपसा करून नदी पात्र खोल केले आहे. नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन जवळपास पाच ते सात फुट ऐवढे खोल करीत आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याची जमीन प्रत्येक वर्षी नदी पात्रातून होत असलेल्या अवैध उत्खननाने खराब होत असल्याने शेतकरी संतापले आहेत.
अधिकारी सहा ट्रॅक्टर पकडतात व एका ट्रॅक्टरला फाईन करतात, ही बाब तेवढीच खरी असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शासकीय मालमत्ता विक्रीला लागण्याची खंत व्यक्त होत आहे.
अधिकाऱ्याने कंत्राटदारांना भोगवट दिलेल्या जागेतून गौण उत्खनन होत नसून दुसऱ्याच जागेतून होत आहे. तर जेवढे ट्रीप रेती कंत्राटदाराने नदी पात्रातून नियमाने रॉयल्टीनुसार नेणे गरजेचे असते, त्यापेक्षा दुप्पटतिप्पट रेती सदर ठिकाणातून नेली जात आहे.
पहाटे या ठिकाणी ट्रॅक्टरांची रांग लागून जागाच भरते, असे दृश्य येथे दिसून येते. राजकीय वरदहस्त असल्याने लालचेच्या पोटी जास्त कमाईच्या भावनेने चुलबंद नदीची सदर कंत्राटदार वाट लावत असल्याची माहिती मारवाडे यांनी दिली.
यात कंत्राटदाराला दिलेल्या घाटाचे मोजमाप करावे, दुसऱ्या जागेतून नेलेल्या वाळूचेही मोजमाप करावी तसेच दोषींवर त्वरित कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन जयपाल मारवाडे, गंगाधर मारवाडे, बबलू मारवाडे यांनी तहसीलदार विठ्ठलराव परडीकर यांना सर्व माहितीसह दिले आहे. तसेच कारवाईची मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)