रामपूरच्या शाळेला अजूनही कुलूप
By Admin | Updated: March 18, 2017 01:54 IST2017-03-18T01:54:20+5:302017-03-18T01:54:20+5:30
जोपर्यंत गावकऱ्यांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही,

रामपूरच्या शाळेला अजूनही कुलूप
आंदोलन चिघळले : गटशिक्षणाधिकारी म्हणतात, टीसी देवून टाका !
साखरीटोला : जोपर्यंत गावकऱ्यांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही, असा ठाम निर्णय रामपूर येथील शाळा समितीच्या पदाधिकारी व गावकऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान आमगावचे गटशिक्षणाधिकारी के.वाय. सर्याम यांनी भ्रमणध्वनीवरुन विद्यार्थ्यांना टी.सी. देवून टाका, असा अफलातून आदेश मुख्याध्यापकाला दिल्याने हे आंदोलन अधिक चिघळले आहे.
आमगाव पं.स. अंतर्गत रामपूर (पानगाव) येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेला शिक्षकाची बदली न करण्याच्या मागणीकरिता १६ मार्चला सकाळी १०.३० वाजता गावकऱ्यांनी कुलूप ठोको आंदोलन केले. शिक्षण विभागाला याबाबतीत माहिती देऊनही एकही अधिकारी तिकडे फिरकला नव्हता. यासंबंधी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच १७ मार्चला गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शिक्षण विस्तार अधिकारी सी.बी. पचारे यांनी शाळेला भेट देवून परिस्थिती जाणून घेतली. त्यावेळी क्षेत्राचे जि.प. सदस्य जियालाल पंधरे उपस्थित होते.
यावेळी गावकऱ्यांनी शाळेतील शिक्षक हेमने यांची बदली करु नये, तसेच नेहमी गैरहजर राहणाऱ्या शिक्षकाला हटविण्यात यावे व वर्गसंख्येनुसार शिक्षक नियुक्त करावे, अशी मागणी केली. त्यावर पचारे यांनी मी निर्णय देवू शकत नाही, अहवाल पाठविला जाईल, अशी भूमिका घेतल्याने गावकऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांना बोलवा व लेखी आश्वासन द्या, अशी मागणी केली. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा ठाम निर्णय घेतला व मागणी पूर्ण न झाल्यास सर्व पालक टी.सी. काढून घेतील, असा निर्णय घेतला.
यावर जि.प. सदस्य जियालाल पंधरे यांनी गटशिक्षणाधिकारी सर्याम यांना भ्रमणध्वनीवर ही बाब सांगितली. त्यावर सर्याम यांनी त्यांच्या टी.सी. देवून टाका, असे उलट उत्तर देवून मुख्याध्यापक बिरणवार यांना लगेच भ्रमणध्वनीवरुन विद्यार्थ्यांच्या टीसी देवून द्या, असा तोंडी आदेश दिल्याने पालक वर्ग अधिकच चिडला व आंदोलन सुरुच ठेवण्याची भूमिका घेतली. संबंधित अधिकाऱ्यांच्या अशा वागण्याची व जनप्रतिनिधीचा मान न ठेवणाऱ्या अधिकाऱ्याची तक्रार जि.प. सदस्य पंधरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली.
या आंदोलनात विद्यार्थी शाळेच्या बाहेर आमगाव-देवरी मुख्य मार्गाला लागून असलेल्या ठिकाणी ज्ञानाचे धडे घेत आहेत. सदर मार्गावर नेहमी वाहने चालत असतात. अशावेळी विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे, यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप गावकरी करीत आहेत.