दारूबंदीवरून लक्ष हटविण्यासाठी पुतळ्याची विटंबना
By Admin | Updated: May 2, 2017 00:28 IST2017-05-02T00:28:36+5:302017-05-02T00:28:36+5:30
खमारी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याच्या चेहऱ्यावर दोन तरूणांनी शेण टाकून विटंबना केली.

दारूबंदीवरून लक्ष हटविण्यासाठी पुतळ्याची विटंबना
खमारीच्या दारूविक्रेत्यांचे कृत्य: अटकेतील आरोपींना ४ मेपर्यंत पोलीस कोठडी
गोंदिया : खमारी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याच्या चेहऱ्यावर दोन तरूणांनी शेण टाकून विटंबना केली. ही घटना २७ एप्रिलच्या सकाळी ६ वाजता उघडकीस आली. खमारी गावात या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण होते. परंतु अवघ्या दोन दिवसात त्या आरोपींचा छडा गोंदिया ग्रामीण पोलिसांनी लावला.
दारुमुळे अख्खे कुटुंब उध्वस्त होत असल्याने दारुचा गावातून समूळ नायनाट करण्यासाठी खमारी येथील महिलांनी सरपंच विमला तावाडे यांच्या नेतृत्वात गावात २५ एप्रिल रोजी जोरदार मोर्चा काढून दारुबंदीविरूद्ध एल्गार पुकारला. खमारी येथे परवानाप्राप्त दारु विक्रीची दुकाने ५०० मिटरमुळे बंद पडली. परंतु अवैध दारुचा महापूर वाहात असल्यामुळे गावाचे वातावरण दूषित होत आहे. लहान मुले, तरुण व्यवसनाच्या आहारी जात आहेत.
या व्यसनापासून तरुण, इसम व मुलांना दूर ठेवण्यासाठी गावातील अवैध दारु, जुगार याविरुद्ध कंबर कसून गावात २५ एप्रिल रोजी ग्रामसभा घेतली. या ग्रामसभेला ३०० पेक्षा अधिक महिलांची हजेरी होती. गावात कोणतेही अवैध धंदे होणार नाही असा एकमुखी ठराव घेऊन नंतर अवैध दारुच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला.
गावातील अवैध दारु विक्रेत्यांना महिलांनी तंबी दिली.या महिलांच्या आक्रमक पवित्र्यामुळे गावातील अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले. त्यांंनी गावातील महिलांचे दारूबंदी या विषयावरून लक्ष दुसरीके नेण्यासाठी त्याच गावातील दोन अवैध दारू विक्रेत्या तरूणांनी गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुध्द यांच्या प्रतिमेवर सेन टाकून पुतळ्यांची विटंबना केली. काही प्रमाणात लोकांचे लक्ष हटविण्यात ते यशस्वीही झाले. परंतु अवैध दारूविक्रेत्यांनी लोकांचे लक्ष दारूबंदी या विषयावरून हटविण्यासाठी हे कृत्य केल्याचे लक्षात आल्यावर आता खमारीत दारूबंदीचा विषय महिलांनी रेटून धरला आहे.
बुधवारच्या रात्री आरोपी नितेश धर्मेंद्र जगने (२२) व शुभम उर्फ सोनू देवानंद रामटेके (२०) या दोघांनी दारूबंदी या विषयाकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावे यासाठी गावातील दोन पुतळ्यांची विटंबना केली.
गुरूवारी सकाळी ही बाब लक्षात येताच गावातील समित किशोर कांबळे (२६) यांनी गोंदिया ग्रामीण पोलिसात तक्रार केली. त्यानंतर लोकांनी गोंदिया-आमगाव मार्गावर रस्ता रोको करून टायर जाळून निषेध व्यक्त केला. या संदर्भात भादंवि कलम २९५ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
गावात अवैध दारूविक्रेत्यांच्या विरोधात गावकऱ्यांचा आक्रोष असल्याने या प्ररणाला शांत करण्यासाठी तसेच गावात दंगे पसरविण्यासाठी अवैध दारूविक्रेते हे कृत्य करू शकतात असा संशय पोलिसांना आल्यामुळे त्यांनी त्या दिशेने तपास केला. परिणामी आरोपी पोलिसांच्या हातात २९ एप्रिलच्या रात्री ९ वाजता लागले. त्यांनी सदर कृत्याची कबुली दिली आहे. न्यायालयाने त्या दोघांना ४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढोके करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
आणखी आरोपींचा समावेश
त्या दोघांना हे कृत्य करण्यासाठी गावातील काही अवैध दारू विक्रेत्यांनी प्रवृत्त केल्याची माहिती आहे. परंतु त्यांना अज्ञाप अटक करण्यात आली नाही. पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. त्या दोघांनी हे जरी कृत्य केले असले तरी त्या कृत्यासाठी कुठे व्यूहरचना रचण्यात आली. याची इतंभूत माहिती काढण्याचा प्रयत्न पोलिसांचा आहे.
अटक करण्यात आलेले दोघेही आधी दारूचा व्यवसाय करीत होते. मी आताच रूजू झाल्यामुळे पुरेशी माहिती नाही. सखोल माहिती पोलीस ठाण्यातून घेतो. या प्रकरणात आणखी कुणा-कुणाचा समावेश आहे याची माहिती पुढे येणार आहे.
-सचिन ढोके सहाय्यक पोलीस निरीक्षक गोंदिया ग्रामीण.