सुरू झाली मान्सूनपर्व सफाई

By Admin | Updated: June 2, 2016 01:15 IST2016-06-02T01:15:05+5:302016-06-02T01:15:05+5:30

पावसाळा आता तोंडावर आला असून जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावून आपल्या आगमनाचे संकेतही दिले आहेत.

Started Monsoon Cleanliness | सुरू झाली मान्सूनपर्व सफाई

सुरू झाली मान्सूनपर्व सफाई

जेसीबी व पोकलँडचा वापर : मोठ्या नाल्यांची आधी सफाई सुरू
गोंदिया : पावसाळा आता तोंडावर आला असून जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावून आपल्या आगमनाचे संकेतही दिले आहेत. पावसाचे हे संकेत बधून नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून मान्सूनपूर्व सफाई अभियानाला सुरूवात करण्यात आली आहे. २५ मे पासून शहरात हे अभियान सुरू झाले. सध्या जेसीबी व पोकलँडच्या माध्यमातून सांडपाणी वाहून जाणाऱ्या मोठ्या नाल्यांची सफाई सुरू आहे.
पावसाळ््यापूर्वी शहरातील पाणी वाहून नेणारे मोठे नाले नगर परिषदेकडून जेसीबीच्या माध्यमातून साफ केले जातात. जेसीबीद्वारे या नाल्यांतील गाळ व कचरा काढून त्यांना मोकळे केले जाते, जेणेकरून त्यातून पावसाचे पाणी वाहून जावे व कुणाच्या घरात पावसाचे पाणी शिरू नये. त्यानुसार नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून २५ मे पासून शहरात मान्सूनपूर्व सफाई अभियानाला सुरूवात झाली आहे.
याअंतर्गत शहरातील श्रीजी लॉन लगतचा नाला, बालाघाट रोड, टी-पॉईंट जवळील नाला, राजाभोज कॉलनी, कटंगी नाला, विवेकानंद कॉलनी, गणेशनगर स्टेट बँक कॉलनी व रिंग रोडवरील नाल्यांची सफाई करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे सफाईच्या या कामात शहरातील नाल्यांवर करण्यात आलेले अतिक्रमण सफाई कामगारांसाठी डोकेदुखीचे ठरते. नाल्यांवरील बांधकामामुळे नाल्यांची योग्य प्रकारे सफाई होत नाही. परिणामी नाल्यांत गाळ साचून राहतो आणि नाल्यांतील पाणी रस्त्यावर येते. त्याचा फटका शहरवासीयांसह खालच्या भागातील रहिवाशांना बसतो.(शहर प्रतिनिधी)

२० कामगारांसाठी मागविली निविदा
मान्सूनपूर्व सफाई अभियानांतर्गत नगर परिषदेच्या सफाई विभागाकडून मोठ्या नाल्यांसाठी जेसीबी व पोकलँडचा वापर केला जात असला तरी लहान व मध्यम नाल्यांची सफाई कामगारांकडून करवून घेतली जाते. यासाठी विभागाने २० सफाई कामगारांसाठी निविदा मागविली आहे. निविदा उघडल्यानंतर ही माणसे उपलब्ध होणार व त्यांच्या माध्यमातून महत्त्वाच्या नाल्यांची सफाई केली जाणार आहे. वास्तविक ही प्रक्रिया आधीच होणे गरजेचे होते. मात्र उशिरा का असेना, नगर परिषदेला शहाणपण आले आहे.

Web Title: Started Monsoon Cleanliness