पाणी पुरवठा योजना सुरू करा
By Admin | Updated: May 16, 2015 01:19 IST2015-05-16T01:19:37+5:302015-05-16T01:19:37+5:30
गोरेगाव तालुक्यातील बोरगाव-सुकपूर येथे जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाई सुरू झाली आहे.

पाणी पुरवठा योजना सुरू करा
गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील बोरगाव-सुकपूर येथे जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाई सुरू झाली आहे. त्यातच मागील तीन वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेली ग्रामीण पाणी पुरवठा योजना अद्याप सुरू करण्यात न आल्याने पिण्याचे पाणी व जनावरांसाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. सदर पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली तर नागरिकांना या भिषण पाणी टंचाईपासून मुक्ती मिळेल, अशी नागरिकांची मागणी आहे.
प्राप्त माहितीनुसार, गोरेगाव तालुक्यातील बोरगाव-सुकपूर हे गाव आदिवासी दुर्गम भागातील गाव आहे. या गावात दरवर्षीच जानेवारी महिन्यापासून पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्यासाठी भीषण टंचाई भाषत असते. भर उन्हाळ्यात गावातील बोअरवेल्स व विहिरींच्या पाण्याची पातळी अत्यंत खाली गेल्याने गावकऱ्यांवर पाण्यासाठी इतरत्र भटकंती करण्याची पाळी येते. मात्र संबंधित प्रशासनाकडून या गावातील पाणी टंचाईकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले आहे.
गावकऱ्यांच्या विनंतीवरून २ एप्रिल २०१२ रोजी ग्रामसभेतील ठरावानुसार ग्रामीण पाणी पुरवठा योजनेला मान्यता प्राप्त झाली. त्यानुसार जिल्हा परिषद गोंदियाचे कार्यकारी अभियंता यांना ठराव पाठविण्यात आले. त्यांच्याकडून ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत बोरगाव-सुकपूर गावाला तांत्रिक मंजुरीनुसार ६ जुलै २०१२ रोजी ग्रामीण पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. मात्र प्रशासन व कंत्राटदार यांच्या हलगर्जीपणा व निष्काळजीपणामुळे त्या योजनेमार्फत अद्यापही गावकऱ्यांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे गावात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी गावकऱ्यांनी जि.प. अध्यक्ष यांना निवेदन दिले आहे. तसेच निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गोंदिया, कार्यकारी अभियंता जि.प. गोंदिया, तहसीलदार व खंडविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. पाणी पुरवठा योजना त्वरित सुरू करण्यासाठी तंमुसचे अध्यक्ष अशोक शेंडे, उपाध्यक्ष हेमराज ठाकूर, सदस्य विनराज मेश्राम, ऋषिपाल ठाकूर, मालीकराम ठाकूर, जगदीश मेश्राम अजीत गौंधर्य आदींनी मागणी केली आहे.
सदर योजनेचे काम अपूर्ण अवस्थेत असून तीन वर्षांपूर्वीच काम बंद करण्यात आले होते. कोणतेही काम १८ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करणे गरजेचे असते. मात्र तीन वर्षांचा कालखंड लोटल्यावरही काम अपूर्ण ठेवण्यामागे काय गौडबंगाल असावे, याबाबत गावकऱ्यांत चर्चा सुरू आहे. या योजनेंतर्गत अर्ध्या गावात पाईप लाईन घालण्यात आले होते. मात्र पाणी पुरवठा सुरू न झाल्याने तीन वर्षांपासून ते तसेच होते. कालांतराने आता ही जुनी पाईप लाईन फुटली आहे. पाणी पुरवठ्यासाठी जुन्याच दोन टाक्या आहेत. मात्र ज्या विहिरीतून तिथे पाणी पोहोचते होणार आहे, त्या विहिरीवर अद्याप मोटार बसविण्यात आली नाही. या प्रकारामुळे बोरगाव-सुकपूरवासी अद्याप पिण्याच्या नळाच्या शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. (प्रतिनिधी)