रस्ते दुरुस्तीनंतरच रेतीघाट सुरु करा
By Admin | Updated: March 5, 2016 02:03 IST2016-03-05T02:03:47+5:302016-03-05T02:03:47+5:30
जवळील घाटकुरोडा वैनगंगा नदीच्या घाटावरून दरवर्षी दोन रेती घाट सुरू होते. पण यावर्षी महसूल विभागाने फक्त माता मंदिर रेती घाटाचा लिलाव केलेला आहे.

रस्ते दुरुस्तीनंतरच रेतीघाट सुरु करा
परिसरातील जनतेची मागणी : रस्त्यांची झाली दुर्गती, नागरिक झाले त्रस्त
मुंडीकोटा : जवळील घाटकुरोडा वैनगंगा नदीच्या घाटावरून दरवर्षी दोन रेती घाट सुरू होते. पण यावर्षी महसूल विभागाने फक्त माता मंदिर रेती घाटाचा लिलाव केलेला आहे. तर दुसरे रेतीघाट सुरु होण्याच्या मार्गावर आहे. मात्र ते घाट सुरू करण्यापूर्वी रस्ते दुरुस्ती करा अशी मागणी घाटकुरोडा, घोगरा, पाटीलटोला व देव्हाडा व परिसरातील जनतेने केली आहे.
एकच घाट सुरु असल्यामुळे घाटकुरोडा, घोगरा, पाटीलटोला व देव्हाळा (एलोरा पेपर मिल) या मार्गाने सरळ रेती भरलेले ट्रॅक नागपूरकडे धावत असतात. यामुळे रस्त्यांचे बेहाल झालेले दिसत आहेत. दररोज सकाळी व संध्याकाळी शेकडोंच्या घरात ट्रकमधून रेतीची जड वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या गावातील रस्ते जिर्ण झाले असून रस्त्यावरील डांबर व गिट्टी गेली कुठे तिचा पत्ताच नाही. परिणामी रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहेत. रस्ता ऐकरी असल्यामुळे अनेक वाहनांना ट्रक जाईपर्यंत थांबून रहावे लागते.
एवढेच नव्हे तर दुचाकी व पायदळ जाणाऱ्यांनाही खूप त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांनी विद्यार्थी तसेच रेल्वेचे प्रवासी मुंडीकोटा स्टेशनवर दररोज गोंदिया येथे सामान घेऊन जात असतात. या रस्त्यांनी तिरोडा आगाराची विद्यार्थ्यांसाठी स्कूल बस सुरु असून ती घोगरा गावापर्यंत येत असते व येथूनच परत जाते. तसेच तुमसर आगाराची तुमसर व तिरोडा व्हाया घाटकुरोडा ही प्रवासी बस दिवसांतून दोन वेळा ये-जा करीत असते. पण या रस्त्यांमुळे स्कूल तसेच प्रवासी बस बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या रस्त्यांनी रेतीची वाहतूक करणारे ट्रक जात असताना रस्त्यावरील धुळ उडून नागरिकांच्या नाकतोंडात शिरत असते.
तसेच ज्यांची रस्त्याच्या शेजारी घरे आहेत त्यांच्या घरावर धुळ जमा होत असते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक गावातील व्यक्ती पहाटे फिरण्याकरिता जात असताना ट्रकमधून रेती उडून अनेकांच्या डोळ्यांत जात असल्याने त्यामुळे डोळ्यांचे आजार होत आहे. तरी संबंधित विभागाने पुर्वी रस्ते दुरुस्त करावे नंतर रेतीघाट सुरु करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.