लोकल, पॅसेंजर गाड्या त्वरित सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:32 IST2021-08-24T04:32:57+5:302021-08-24T04:32:57+5:30
गोंदिया : गोंदिया-बल्लारशा व गोंदिया-बालाघाट-कटंगी या पॅसेंजर रेल्वे गाड्या अद्यापही सुरू करण्यात आल्या नाही. त्यामुळे गोरगरीब प्रवाशांना आर्थिक भुर्दंड ...

लोकल, पॅसेंजर गाड्या त्वरित सुरू करा
गोंदिया : गोंदिया-बल्लारशा व गोंदिया-बालाघाट-कटंगी या पॅसेंजर रेल्वे गाड्या अद्यापही सुरू करण्यात आल्या नाही. त्यामुळे गोरगरीब प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या गाड्या त्वरित सुरू न केल्यास १५ सप्टेंबर रोजी नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील सौंदड रेल्वे चौकी येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दिला आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षापासून अनेक लोकल आणि पॅसेंजर गाड्या रेल्वे विभागाने बंद केल्या आहे. केवळ विशेष गाड्या सुरू ठेवल्या होत्या. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून निर्बंधसुद्धा शिथिल करण्यात आले आहेत. परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. मात्र, यानंतर रेल्वे विभागाने केवळ विशेष गाड्या सुरू ठेवून प्रवाशांची लूट सुरू ठेवली आहे. यामुळे सर्वसामान्य आणि गोरगरीब प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. विशेष गाड्यांमधील प्रवाशांची गर्दी वाढत आहे. मग कोरानाचा संसर्ग केवळ लोकल आणि पॅसेंजर गाड्या सुरू केल्यानेच होताे काय, असा सवाल भाकपाने केला आहे. गोंदिया-चंद्रपूर-बल्लारशा, गोंदिया-बालाघाट-कटंगी या पॅसेंजर गाड्या पूर्ववत सुरू करून प्रवाशांची लूट थांबवावी अन्यथा १५ सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा मिलिंद गणवीर, रामचंद्र पाटील, करुणा गणवीर, शेखर कनोजिया, अशोक मेश्राम, माधव बांते, सदानंद इलमे, राजू बडोले, देवांगणा सयाम, देवराव चवडे, ॲड. जगदीश मेश्राम, संतोष दास, विनोद झाेडगे यांनी दिला आहे.
..................
मजुरांना फटका
गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, छत्तीसगड, मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात गरीब मजुरांचे नियमित स्थलांतर होते. मात्र, गोंदिया-चंद्रपूर-बल्लारशा, गोंदिया-बालाघाट-कटंगी या पॅसेंजर गाड्या बंद असल्याने गरीब मजुरांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे, तर गोरगरीब प्रवाशांना अतिरिक्त प्रवासभाडे देऊन प्रवास करावा लागत आहे.
.......