रब्बीतील धान खरेदीसाठी शासकीय केंद्र सुरु करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:28 IST2021-04-25T04:28:52+5:302021-04-25T04:28:52+5:30
बिरसी फाटा : जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी धानाची सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सध्या रब्बी धानाची मळणी सुरु ...

रब्बीतील धान खरेदीसाठी शासकीय केंद्र सुरु करा
बिरसी फाटा : जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी धानाची सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सध्या रब्बी धानाची मळणी सुरु झाली आहे. त्यामुळे बरेच शेतकरी धान विक्रीसाठी बाजारपेठेत आणत आहे. त्यामुळे शासनाने रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी शासकीय धान खरेदी केंद्र १ मे पर्यंत सुरु करण्याची मागणी शेेतकऱ्यांनी केली आहे.
तिरोडा तालुक्यात खरीप हंगामासह रब्बी धान पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मागील खरीप हंगामातील खरेदी केलेले धान अजूनही विविध गोदामात पडून आहेत. धान भरडाईसाठी उचल न झाल्याने रब्बी धान खरेदीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकार आणि राईस मिलर्स यांच्या अडचणीवर त्वरित तोडगा काढून उन्हाळी धान खरेदीचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. आधीच शेतकरी व कष्टकरी जनता व मजूर कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे हैराण झाले आहेत. हाताला काम नाही,खिशात पैसे नाहीत अशात उदरनिर्वाहाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. निसर्ग व शासनाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांची हालत बिघडत चालली आहे. मात्र अशाही स्थितीत शेतकरी शेती करीत आहे. जे काही धानाचे उत्पादन झाले आले ते हमीभाव केंद्रात विक्री करुन आपल्या कुटुंबाचा गाडा चालवितात. आता रब्बी धान पीक कापणीवर आले आहे. अशात खरीप हंगामात खरेदी करुन गोदामातील धान त्वरित उचल करुन उन्हाळी धान विक्रीसाठी हमीभाव धान खरेदी केंद्र १ मे पर्यंत सुरु करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे गोंदिया जिल्हा महासचिव लायकराम भेंडारकर यांनी केली आहे.