रोजगार हमीची कामे सुरू करा

By Admin | Updated: February 11, 2015 01:33 IST2015-02-11T01:33:52+5:302015-02-11T01:33:52+5:30

अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात मजुरांना दिवाळीनंतर पोटाची खळगी भरण्यासाठी काम मिळत नाही. बेरोजगारांच्या हातांना काम मिळत नाही.

Start Employment Guarantee | रोजगार हमीची कामे सुरू करा

रोजगार हमीची कामे सुरू करा

बाराभाटी : अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात मजुरांना दिवाळीनंतर पोटाची खळगी भरण्यासाठी काम मिळत नाही. बेरोजगारांच्या हातांना काम मिळत नाही. त्यामुळे मजूर हे परिसर सोडून कामाच्या शोधात बाहेर जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या परिसरात विकासाला गती नाही. शोषणकर्ते शोषण करीत असून गोरगरीब नागरिकांना कुणीही हाताशी धरत नाही. तसेच स्वत:ला भूमिपुत्र समझणारे शेतकऱ्यांना जवळ करीत नाही. धानाला भावही मिळत नाही. अशा अनेक समस्या तालुक्यात आ वासून उभ्या आहेत. तरीसुद्धा कुणीही लक्ष देत नाही. मग येथील गरीब नागरिक पलायन करणार नाही तर काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ६० टक्के भागात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यात आल्याचे चित्र रोजच दिसत आहे. मात्र बाराभाटी परिसरात अद्यापही रोजगार हमी योजनेचे काम सुरू झालेच नाही. स्थानिक परिसरात हातांना काम मिळेल या आशेने काही नागरिक वाट पाहत आहेत. तर काही लोक दुसऱ्या भागात जावून काम करीत असल्याचे वास्तव आहे.
परिसरातील येरंडी-देव, बाराभाटी, कुंभीटोला, ब्राह्मणटोला, सुकडी-खैरी, दाभना, पिंपळगाव, खांबी, देवलगाव, डोंगरगाव, कवढा, बोळदे, चापटी, सूरगाव आदी गावांमध्ये रोजगार हमी योजनेची कामे अद्यापही सुरू करण्यात आली नाहीत.
सदर परिसरात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री व पालकमंत्री राजकुमार बडोले यांना निवेदन देण्यात आले आहे.
परंतु स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी, अधिकारी, ग्रामसेवक, रोजगार सेवक व पदाधिकाऱ्यांचे रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याकडे दुर्लक्ष असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.
या प्रकारामुळे शेतकरी, मजूरवर्गात व गावकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तत्काळ रोजगार हमी योजनेची कामे सुरू करून मजुरांना व बेरोजगारांच्या हातांना काम द्यावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: Start Employment Guarantee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.