दहावीच्या उत्तरपत्रिकांना संपाचा फटका
By Admin | Updated: March 21, 2015 01:58 IST2015-03-21T01:58:23+5:302015-03-21T01:58:23+5:30
गेल्या १० मार्चपासून सुरू झालेल्या पोस्टाच्या उपडाकपालांच्या संपाचा दहावीच्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांना फटका बसला आहे.

दहावीच्या उत्तरपत्रिकांना संपाचा फटका
गोंदिया/सडक-अर्जुनी : गेल्या १० मार्चपासून सुरू झालेल्या पोस्टाच्या उपडाकपालांच्या संपाचा दहावीच्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांना फटका बसला आहे. जिल्हाभरातील शंभरावर शाखा डाकघरांमध्ये हे पेपरचे गठ्ठे पडले आहेत. त्यावर तोडगा म्हणून आता संबंधित पेपर तपासणी करणाऱ्या शिक्षकांनी स्वत:च ते गठ्ठे तेथून घेऊन जाण्याचा आदेश शिक्षण मंडळाने दिला आहे.
ग्रामीण भागातील डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे उत्तरपत्रिकांचे गठ्ठे डाकघरातच पडून आहेत. संप केव्हा संपेल व उत्तरपत्रिका तपासणीकरिता कधी बोर्डात जातील, अशी समस्या निर्माण झाली आहे. सडक-अर्जुनीसह जिल्ह्यातील अनेक उपडाकघरांमध्ये आणि त्याअंतर्गत येणाऱ्या जवळपास १०० शाखा डाकघरांमध्ये उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तसेच पडून असल्याने निकाल प्रभावित होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक वर्षी दहावी-बारावी परीक्षेच्या वेळी काही ना काही वाद उभा होतोच. कधी शिक्षकांचा संप तर कधी उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकणावर बहिष्कार, या दरवर्षीच्या बाबी आहेत. मात्र यंदा ग्रामीण भागातील डाकसेवकांनी संप पुकारल्याने उत्तरपत्रिकांची तपासणीच होईल किंवा नाही, याची शंका व्यक्त केली जात आहे. तसेच यावर तोडगा काढण्याची मागणीसुद्धा होत आहे. ग्रामीण भागातील अनेक डाकघरांत गठ्ठे पडून आहेत. यावर तोडगा म्हणून आता ज्या शिक्षकाकडे ते पेपर पोहोचवायचे आहेत त्या शिक्षकानेच ते पोस्ट आॅफिसमधून घेऊन जावेत, असे निर्देश शिक्षण मंडळाने दिले आहेत.
दहावीची परीक्षा ३ मार्चपासून सुरू झाली आणि ग्रामीण भागातील डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी १० मार्चपासून संप सुरू केला. त्यांच्या मागण्यांमध्ये डाकसेवकांना सातव्या वेतन आयोगात सामील करणे, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, कामाचे आठ तास घेवून खात्यात समाविष्ट करणे, सेवकांच्या वारसाला १०० टक्के अनुकंपा नियुक्ती देणे, सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देणे, पदोन्नती पगार देणे आदी मागण्यांचा समावेश आहे. सडक-अर्जुनी डाक विभागांतर्गत बडोले, गहाणे, रामरामे, वर्मा, मेश्राम, वाढीवे, कापगते, मुंगतोडे, येळे, बिसेन, चौरागडे, मेश्राम, वैद्य, जनबंधू, धमगाये, मौजे, काळसर्पे, उंदिरवाडे आदी डाकसेवक संपावर असल्याची माहिती आहे.
या संपामुळे ग्रामीण भागात अनेक कामे प्रभावित झाली आहेत. डाक घरातील डाकसेवकांशिवाय त्याला सहकार्य करण्यासाठी कर्मचारी नसल्याने नियमित व महत्त्वाची कामे प्रभावित झाली. दहावीच्या पेपरचे गठ्ठे कस्टडीतून डाकघरात जमा केले जातात. डाकघरातून सदर गठ्ठे पुढील ठिकाणी पोहोचते झाले नाही. मागील वर्षी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर प्राध्यापकांनी बहिष्कार घातल्याने निकाल विलंबाने लागला होता. (प्रतिनिधी/शहर प्रतिनिधी)