एसटी सुसाट; जिल्ह्यात ‘त्या’ ४ कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 05:00 IST2022-05-04T05:00:00+5:302022-05-04T05:00:06+5:30
महामंडळातील कर्मचारी ३१ ऑक्टोबरपासून आंदोलनावर गेले होते. सुमारे ५ महिने सुरू असलेल्या आंदोलनात मध्यस्थी करीत उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल रोजी कामावर हजर होण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला मान देत जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा आगारातील कर्मचारी हळूहळू कामावर रुजू होऊ लागले होते. गोंदिया आगारातील सर्व २६३, तर तिरोडा आगारातील फक्त ४ कर्मचारी सोडून उर्वरित १६० कर्मचारी कामावर रुजू झाले.

एसटी सुसाट; जिल्ह्यात ‘त्या’ ४ कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार?
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करीत आंदोलनात सहभागी राज्य परिवहन महामंडळातील सर्वच कर्मचारी दिलेल्या मुदतीच्या एक दिवस आधीच कामावर रुजू झाले. कर्मचारी कामावर आल्याने आगार पुन्हा एकदा गजबजले आहे. आता एसटी महामंडळाचा कारभार पुन्हा सुरळीत होणार आहे. ४ कर्मचारी हजर न झाल्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करा, या मागणीसाठी महामंडळातील कर्मचारी ३१ ऑक्टोबरपासून आंदोलनावर गेले होते. सुमारे ५ महिने सुरू असलेल्या आंदोलनात मध्यस्थी करीत उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल रोजी कामावर हजर होण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला मान देत जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा आगारातील कर्मचारी हळूहळू कामावर रुजू होऊ लागले होते. गोंदिया आगारातील सर्व २६३, तर तिरोडा आगारातील फक्त ४ कर्मचारी सोडून उर्वरित १६० कर्मचारी कामावर रुजू झाले.
गोंदिया आगारातील शंभर टक्के कर्मचारी हजर
- ५ महिने सुरू असलेल्या या आंदोलनामुळे एसटी महामंडळाची व्यवस्थाच विस्कळीत झाली होती. शिवाय, चालक-वाहक आंदोलनात असल्यामुळे बस आगारातच उभ्या होत्या. गोंदिया आगारातील २६३ कर्मचारी कामावर हजर झाले.
- एसटी कर्मचारी कामावर परतल्याने एसटी महामंडळाचा कारभार पुन्हा सुरळीत होणार आहे. प्रवाशांची लाडकी लालपरी पुन्हा त्यांच्यासाठी रस्त्यावर धावत आहे.
३३ गाड्या भंडारा येथे पाठविल्या
- मागील ५ महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असून, कित्येक गाड्या तेव्हापासूनच आगारात उभ्या होत्या. अशात गोंदिया आगारातील २६, तर तिरोडा आगारातील ७ अशा एकूण ३३ गाड्या आरटीओ पासिंगसाठी भंडारा कार्यालयात पाठविण्यात आल्या आहेत.
लांब पल्ल्यांच्या गाड्यांना ब्रेक
- कर्मचारी आंदोलनात असल्याने फेऱ्या बंद होत्या. कंत्राटी चालकांना कामावर घेऊन काही मोजक्याच फेऱ्या सुरू असल्याने आगारांनी लांब पल्ल्यांच्या गाड्यांना ब्रेक मारला होता. त्यामुळे प्रवाशांची अडचण होत होती. आता कर्मचारी कामावर आल्याने आगारांना लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू करता येणार व त्यामुळे प्रवाशांनाही सोय होणार आहे.
रातराणीही झाली सुरू
- नागरिकांना आपली कामे आटोपून रात्रीपर्यंत गावाला जाता यावे यासाठी रातराणी बस सुरूच ठेवण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांना या रातराणीचा लाभ मिळतो.
- रात्रीच्या वेळी ग्रामीण भागात थांबा करणारी एसटी दुसऱ्या दिवशी सकाळीच पुन्हा मार्गावर धावू लागत असल्याने या एसटीचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना होत आहे.
ग्रामीण भागात बस सुरू
-ऑक्टोबर महिन्यापासून कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले असून, त्यामुळे संपूर्ण बसफेऱ्या बंद होत्या. पाच महिन्यांनंतर आता त्या सुरू झाल्या आहेत.
- मागील १-२ महिन्यांपासून कंत्राटी चालक कामावर घेऊन त्यांच्याकडून सध्या काही मोजक्याच फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, या फेऱ्या मुख्य मार्गावरील असल्याने ग्रामीण भागात लालपरी गेली नव्हती.
-आता कर्मचारी कामावर परतल्याने गोंदिया आगाराने ग्रामीण भागात ६४ फेऱ्या सुरू केल्या आहेत. ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहे.