शहरातील स्वच्छतेवर आता पथकाची नजर
By Admin | Updated: November 13, 2014 23:03 IST2014-11-13T23:03:51+5:302014-11-13T23:03:51+5:30
स्वच्छता अभियानाला गती देण्यााठी आता जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून त्याअंतर्गत पथकांचे गठन करण्यात आले आहे. या जिल्हास्तरीय शालेय व सार्वजनिक स्वच्छतागृहे तपासणी

शहरातील स्वच्छतेवर आता पथकाची नजर
गोंदिया : स्वच्छता अभियानाला गती देण्यााठी आता जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून त्याअंतर्गत पथकांचे गठन करण्यात आले आहे. या जिल्हास्तरीय शालेय व सार्वजनिक स्वच्छतागृहे तपासणी पथकाने १२ आॅक्टोबर रोजी शहरातील विविध स्थळांची पाहणी केली. पथकातील अधिकाऱ्यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधून तसेच बैठकांचे आयोजन करून जनजागृती करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.
पंतप्रधानांनी सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ला देशभरातून प्रतिसाद लाभत असतानाच आता गोंदिया शहरासह जिल्ह्यातील अस्वच्छतेबद्दल जिल्हा प्रशासन गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी स्वच्छता अभियानाच्या कडक अंमलबजावणीसाठी विविध पथकांचे गठन केले आहे. यातील जिल्हास्तरीय शालेय व सार्वजनिक स्वच्छतागृह तपासणी पथकाने १२ आॅक्टोबर रोजी शहरात पाहणी केली.
जिल्हा पथकाचे सदस्य जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील, नगर परिषद मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्यासह नगर परिषद आरोग्य निरीक्षक मनकवडे, गणेश हतकय्या, मुकेश तिवारी यांनी शहरात पाहणी केली. या पथकाने कुरील यांच्या मार्गदर्शनात नगर परिषद कार्यालयासह केटीएस रूग्णालय, नगर परिषद कन्या विद्यालय, प्रभु रोड, रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल अप्सरा व हॉटेल उमेश, रेल्वे स्थानकाच्या आत व बाहेरचा परिसर, मुख्य बाजारभागातील सार्वजनिक शौचालय, मुख्य बस स्थानक, रेलटोली परिसरातील नगर परिषद हिंदी शाळा तसेच अन्न व औषध प्रशासन कार्यालयाची पाहणी केली. या पाहणीअंतर्गत पथकाने नागरिकांना सफाई अभियानाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल व्यवसायिकांची बैठक घेऊन जनजागृती करण्याचे निर्देश आरोग्य निरीक्षकांना यावेळी देण्यात आले. विशेष म्हणजे केटीएस रूग्णालयातील पाहणीदरम्यान डॉक्टरांना रूग्णालयाच्या सफाईसह मेडीकल वेस्टेजची नियमबद्धरित्या विल्हेवाट लावण्यासंबंधी निर्देश देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)