ठिकठिकाणी दारूभट्ट्यांवर धाडसत्र

By Admin | Updated: March 8, 2015 01:12 IST2015-03-08T01:12:56+5:302015-03-08T01:12:56+5:30

होळीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबविलेल्या विशेष मोहिमेत दोन दिवसात अनेक हातभट्ट्यांवर कारवाई करून १९ कारवाया केल्या. यात अडीच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.

At the spot | ठिकठिकाणी दारूभट्ट्यांवर धाडसत्र

ठिकठिकाणी दारूभट्ट्यांवर धाडसत्र

गोंदिया : होळीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबविलेल्या विशेष मोहिमेत दोन दिवसात अनेक हातभट्ट्यांवर कारवाई करून १९ कारवाया केल्या. यात अडीच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.
होळीनिमित्त होणाऱ्या अवैध मद्य निर्मिती व वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनात विशेष अभियान राबविले. दि.४ व ५ रोजी राबविलेल्या या अभियानात गोंदिया ग्रामीण, गोरेगाव, सालेकसा परिसरात अनेक हातभट्ट्या उद्ध्वस्त करून हातभट्ट्यांसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. या सामूहिक मोहिमेत गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी येथील तेजराम दयाराम साखरे या इसमाकडून १.४४ लिटर देशी दारू व काही विदेशी दारूही जप्त करण्यात आली.
सालेकसा तालुक्यात टाकलेल्या धाडीत गोरे येथील रामेश्वर मुन्नालाल उईके, जमाकुडो येथील झारीपार मिलन जोडी, दुर्गुटोला येथील भूमेश्वर सजनदास राऊत आणि धनेगाव येथील गोविंद नैताम अशा ५ आरोपींना अवैध मद्य बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली.
गोंदिया ग्रामीण परिसरात टेमनी नाल्याच्या काठावर आणि भाद्याटोला येथे टाकलेल्या धाडीत अवैध हातभट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. त्यात ९५ लिटर मोहादारू जप्त करण्यात आली. यावेळी ५३२० लिटर मोहा सडवा जप्त करण्यात आला.
गोरेगाव तालुक्यात लेंडेझरी व हेटी परिसरात टाकलेल्या धाडीत २ हातभट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. १२०० लिटर मोहा सडवा जागीच नष्ट करण्यात आला. गोरेगाव तालुक्यात अवैधपणे मद्याची विक्री करताना सुनील तांडेकर रा.कवलेवाडा व नरेश उईके रा.नवरगाव या आरोपींना अटक करण्यात आली.
या मोहिमेत एकूण १९ गुन्हे नोंदविण्यात आले. हातभट्ट्यांवरील कारवायांमध्ये ७ भट्ट्या वारस तर १२ बेवारस होत्या. सापडलेल्या ७ आरोपींना मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ अंतर्गत अटक करण्यात आली. तसेच २ लाख ५० हजार २४५ रुपयांचा एकूण ऐवज जप्त करण्यात आला.
सदर मोहिमेत अधीक्षक धार्मिक यांच्या मार्गदर्शनात देवरीचे निरीक्षक गोतमारे, गोंदियाचे प्रभारी निरीक्षक आकरे, गोंदिया शहरचे दु.निरीक्षक विडुंभ, दु.निरीक्षक (ग्रामीण) मंडलवार, बोलधने, दुय्यक निरीक्षक (देवरी) बोंडेवार, सहायक दुय्यम निरीक्षक रहांगडाले, हुमे, जवार, ढाले, पागोटे, ढोमणे, कांबळे, मुनेश्वर, फुंडे, वाहनचालक मडावी व सोनबर्से यांनी सहभाग घेतला. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: At the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.