उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: October 11, 2014 23:09 IST2014-10-11T23:09:05+5:302014-10-11T23:09:05+5:30
गांधी घराण्यातील व्यक्ती सत्तेत असो की सत्तेबाहेर, तिच्याबद्दल नागरिकांमध्ये कायम उत्सुकता असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. शनिवारी सायंकाळी गोंदियात झालेल्या सभेत गोंदिया जिल्ह्यासह भंडारा

उत्स्फूर्त प्रतिसाद
नागरिकांची उत्सुकता : सोनिया गांधी यांनी गोंदियातील सभा जिंकली
गोंदिया : गांधी घराण्यातील व्यक्ती सत्तेत असो की सत्तेबाहेर, तिच्याबद्दल नागरिकांमध्ये कायम उत्सुकता असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. शनिवारी सायंकाळी गोंदियात झालेल्या सभेत गोंदिया जिल्ह्यासह भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावून सोनिया गांधींना ऐकण्यासाठी गर्दी केली.
दुपारी ३ वाजतापासून सर्कस मैदानात गर्दी जमायला सुरूवात झाली होती. सुरक्षेच्या दृष्टीने जड वाहनांना शहराबाहेरच अडविण्यात आल्याने बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांना दोन ते तीन किलोमीटर पायी चालत यावे लागले. तरीही नागरिक विनातक्रार तब्बल तीन तास बसून होते. यात महिलांचीही संख्या लक्षणीय होती.
सायंकाळी ५.१५ च्या सुमारास सोनिया गांधींचे हेलिकॉप्टरने ब्रह्मपुरीवरून गोंदियाच्या बिरसी विमानतळावर आगमन झाले. यानंतर त्यांचा ताफा थेट गोंदियातील सर्कस मैदानावरील सभेसाठी रवाना झाला. यादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा ठिकठिकाणी नागरिकांनी त्यांची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती. ५.४० च्या सुमारास त्यांचे सभास्थळी आगमन झाले.
दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेसच्या उमेदवारांनी त्यांचे स्वागत केले तर आ.गोपालदास अग्रवाल यांनी शाल पांघरून त्यांचा सत्कार केला.
प्रास्ताविक भाषणातून गोपालदास अग्रवाल यांनी गोंदियात झालेल्या विकास कामांची माहिती दिली. ते म्हणाले, केंद्रात काँग्रेसप्रणित शासन असल्यामुळेच गोंदियात मेडिकल कॉलेज, वाढीव पाणी पुरवठा योजनेसारख्या मोठ्या कामांना मंजुरी मिळाली. सत्तापक्षाचे आमदार असतानाही आपण शासन दरबारी आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी अक्षरश: भांडलो. यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आपल्याला पाठबळ मिळाल्यामुळेच हे करू शकलो, असे ते म्हणाले. यावेळी आ.रामरतन राऊत, पी.जी. कटरे यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन अपूर्व अग्रवाल यांनी केले.