आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालांना गती द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:37 IST2021-04-30T04:37:08+5:302021-04-30T04:37:08+5:30
गोंदिया : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विषाणू निदान प्रयोगशाळा कार्यरत आहे. या प्रयोगशाळेत जास्तीत जास्त नमुन्यांची तपासणी व्हावी, यासाठी दोन ...

आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालांना गती द्यावी
गोंदिया : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विषाणू निदान प्रयोगशाळा कार्यरत आहे. या प्रयोगशाळेत जास्तीत जास्त नमुन्यांची तपासणी व्हावी, यासाठी दोन मशीन बसविण्यात आली. मात्र, येथील प्रयोगशाळा मनुष्यबळामुळे अडचणीत आली आहे. गोंदिया प्रयोगशाळेत नमुन्यांच्या तपासणीचे काम कमी झाले आहे. यामुळे बाधितांना संशय निर्माण झाला आहे. अनेक घरांत इतर आजार असलेले रुग्ण चाचणी अहवालाअभावी घरात राहत आहेत. या प्रकाराने इतरांना संसर्गाचा धोका वाढला आहे. याकडे लक्ष देऊन प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचणी अहवालाला गती द्यावी, अशी मागणी छावा संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष नीलम हलमारे यांनी केली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यातच हळुवारपणे संसर्गाचा उद्रेक वाढत असल्याने बाधितांची संख्याही वेगाने वाढत आहे. दुसऱ्या लाटेला वेळीच थांबविण्याच्या अनुषंगाने आरोग्य विभागाकडून टेस्टिंग व ट्रेसिंगवर भर देण्यात आले. यानुरूप संशयित व संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे नमुने संकलित करून तपासणीच्या मोहिमेला वेग देण्यात आला. परंतु दिवसेंदिवस जिल्हा प्रयोगशाळेतील प्रलंबित नमुन्यांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे लक्षणे असलेल्यांचा अहवाल आठ-आठ दिवस लोटूनही मिळत नाही. यामुळे बाधितांच्या संपर्कात येणाऱ्या इतरांनाही संसर्गाचा धोका वाढला आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन प्रलंबित अहवाल लवकर मिळणार, या दिशेने काम करावे, अशी मागणी छावा संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष नीलम हलमारे यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.