स्पेशल रेल्वे रुळावर पण प्रवाशांच्या खिशाला दुप्पट फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:45 IST2021-02-05T07:45:37+5:302021-02-05T07:45:37+5:30
गोंदिया : मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे रेल्वेसेवा सुध्दा पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर ...

स्पेशल रेल्वे रुळावर पण प्रवाशांच्या खिशाला दुप्पट फटका
गोंदिया : मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे रेल्वेसेवा सुध्दा पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर दोन महिन्यापूर्वी रेल्वे विभागाने काही स्पेशल गाड्या सुरू केल्या. या गाड्यांची संख्या हळूहळू वाढविली जात आहे. मात्र या गाड्यांचे प्रवास भाडे दुप्पट असल्याने त्याचा भुर्दंड प्रवाशांना बसत आहे. गोंदिया ते मुंबई या प्रवासाठी प्रवाशांना २५० रुपये अधिकचे भाडे मोजावे लागत आहे तर गोंदिया ते नागपूरसाठी ९५ रुपये भाडे मोजावे लागत आहे. प्रवासी भाडे दुप्पट वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला त्याचा फटका बसत आहे.
हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे महत्वपूर्ण रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावरून दररोज २५ ते ३० हजार प्रवासी ये-जा करीत होते. मात्र आता ही संख्या फारच कमी आहे. रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी लांब पल्ल्याच्या काही विशेष गाड्या सुरु केल्या असून गोंदिया येथून दररोज २५ विशेष गाड्या सध्या धावत आहेत. पण या गाड्यांचे प्रवास भाडे अधिक असल्याने प्रवाशांना त्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. तर पॅंसेजर गाड्या अद्यापही सुरु न झाल्याने प्रवाशांना बसने प्रवास करावा लागत आहे. जिल्ह्यातील प्रवासी या पॅसेंजर गाड्या सुरु होण्याची वाट पाहत असून रेल्वे विभाग या गाड्यांना कधी हिरवी झेंडी दाखवितो याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.
......
छोट्या अंतरासाठी भाड्यात वाढ
गोंदिया ते नागपूर हे १५० किमीचे अंतर असून या मार्गावर रेल्वे प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. लॉकडाऊनपूर्वी या अंतरासाठी केवळ ७५ रुपये मोजावे लागत होते तर आता ९५ रुपये मोजावे लागत असून स्पेशल गाडी व्दितीय श्रेणीसाठी आरक्षित तिकिटासाठी २७५ रुपये भाडे मोजावे लागत आहे. छोट्या अंतरासाठी प्रवाशांना ३० ते ४० रुपये अतिरिक्त मोजावे लागत आहे.
......
छोट्या अंतराचे भाडे
गोंदिया ते तिरोडा, गोंदिया ते तुमसर या कमी अंतरासाठी ४५ रुपये प्रवास भाडे आकारले जात होते. आता याच अंतरासाठी ६५ रुपये मोजावे लागत आहे. तर गोंदिया ते भंडारा या प्रवासाठी ४५ रुपये मोजावे लागत होते. आता यासाठी सुध्दा अधिक पैसे मोजावे लागत आहे.
.....
मोठ्या अंतरासाठी भाडे
गोंदिया ते मुंबईसाठी विदर्भ एक्स्प्रेसने जाणाऱ्या प्रवाशांना सध्या ४१५ रुपये भाडे मोजावे लागत आहे. गोंदिया रायपूरसाठी १५६ रुपये, गोंदियाहून पुणेसाठी ४७८ रुपये मोजावे लागत आहे. प्रवासासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहे.
......
कोरोनापूर्वी
९५ गाड्या धावत होत्या.
.......
आता
२५ गाड्या धावतात.
........
कोट
रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी स्पेशल गाड्या सुरु केल्या असल्या तरी तिकिट दरात दुप्पट वाढ केल्याने त्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. गाड्यांची संख्या वाढवून तिकिट दर पूर्ववत करण्याची गरज आहे.
- राहुल पारखी, प्रवासी,
......
रेल्वे विभागाने स्पेशल गाड्याप्रमाणेच पॅंसेजर गाड्या सुरु केल्यास प्रवाशांना त्याची मदत होईल. कोरोनानंतर आता परिस्थिती पूर्वपदावर आली असून तिकिट दर कमी करावा.
- संतोष वाढई, प्रवासी.