लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : माजी नगराध्यक्ष गोविंद शेंडे यांच्या निधनामुळे स्थगित केलेली नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा गुरूवारी (दि.२९) बोलाविण्यात आली होती, मात्र विषय सूचीत एक पेक्षा जास्त विषय असून तोही स्पष्ट नसल्याने ही सभा कोणत्याही नियमात बसत नसल्याचा ठपका सत्ता पक्षातील नगरसेवक बंटी पंचबुद्धे यांनी ठेवला. यावर उपस्थित सर्वच सदस्यांनी सभा रद्द करण्याची मागणी उचलून धरली अखेर नगराध्यक्षांना ही सभा रद्द करावी लागली.नगर परिषदेंतर्गत येणाऱ्या सर्व क्षेत्रासाठी शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधी अंतर्गत विकास कामांचा आराखडा मंजुरी व निर्णय या सभेत घेण्यात येणार होता. या विषयाला घेऊन मंगळवारी (दि.२७) ही विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली होती. मात्र माजी नगराध्यक्ष शेंडे यांचा मृत्यू झाल्याने सभा स्थगित करून गुरूवारी (दि.२९) बोलाविण्यात आली. त्यानुसार, गुरूवारी सभा सुरू होताच नगरसेवक पंचबुद्धे यांनी ही सभा महाराष्ट्र नगर पालिका नगरपंचायती व औद्योगीक वसाहत नगरी अधिनियम १९६५ च्या कोणत्याही कलमात बसत नसून मोगम स्वरूपात बोलाविण्यात आली असल्याचे सांगत सभा रद्द करण्याची मागणी करीत तसे पत्र नगराध्यक्ष अशोक इंगळे यांना दिले.शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधी अंतर्गत विकास कामांचा आराखडा मंजुरी व निर्णयास्तव मांडला जाणार असल्याचे विषय सूचीत नमूद असतांना प्रस्तावित कामे सुद्धा विषय सूचीत अंकीत करणे आवश्यक होते, मात्र तसे केले नव्हते. अशात कोणत्या कामांना मंजुरी द्यावयाची आहे हे दिसून येत नसल्याने सभा बेकायदेशीर दिसून येते. शिवाय, केवळ बांधकाम विभाग प्रमुखांची टिपणी दिली. बांधकाम स्वरूपाचीच कामे प्रस्तावित करावयाच असल्याचे दिसून येत असल्याचा मुद्दा पंचबुद्धे यांनी मांडला व तसे पत्र दिले. यावर गटनेता घनशाम पानतवने यांनी सभा रद्द करण्याचा प्रस्ताव मांडल्याची माहिती आहे. त्यानुसार, सत्ताधारी व विरोधी पक्षातील सर्वच सदस्यांनी एकत्र येऊन सभा रद्द करण्याची मागणी केली. अखेर नगराध्यक्ष इंगळे यांना सभा रद्द करावी लागली.सभेच्या सूचनेबाबत सदस्य संभ्रमातनगर परिषद सदस्यांना देण्यात आलेल्या सभेच्या सूचनेत ‘विशेष सर्वसाधारण सभा’ असे नमूद आहे. नगर पालिक अधिनियमांत अशा सभेबाबत तरतूद नाही. एकतर सभा विशेष असावी किंवा सर्वसाधारण असावी. मात्र सूचनेत विशेष सर्वसाधारण सभा नोंद असल्याने सदस्यांना संभ्रम पडला. शिवाय,सभेतील विषय नेमके काय हेच स्पष्ट होत नसल्याने ही सभा बेकायदेशीर ठरवित रद्द करण्याची मागणी करून रद्द करवून घेतली.याप्रकारानंतर मात्र नगर परिषदेतील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.जेथे खुद्द सत्ताधारी पक्षातील सदस्यच खूश नाहीत व त्यांनाच सभा रद्द करण्याची मागणी करावी लागत असल्याने नगर परिषदेत काय सुरू आहे हे समजेनासे झाले आहे. मात्र सभेत सत्ताधारी पक्षातील भाजपला घरचा आहेर मिळाला हे दिसून आले.
नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 21:47 IST
नगर परिषदेंतर्गत येणाऱ्या सर्व क्षेत्रासाठी शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधी अंतर्गत विकास कामांचा आराखडा मंजुरी व निर्णय या सभेत घेण्यात येणार होता. या विषयाला घेऊन मंगळवारी (दि.२७) ही विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली होती. मात्र माजी नगराध्यक्ष शेंडे यांचा मृत्यू झाल्याने सभा स्थगित करून गुरूवारी (दि.२९) बोलाविण्यात आली.
नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा रद्द
ठळक मुद्देभाजपला घरचा अहेर : सत्ताधारी व विरोधी सदस्य एकवटले