सततच्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या
By Admin | Updated: June 24, 2015 02:01 IST2015-06-24T02:01:07+5:302015-06-24T02:01:07+5:30
पावसाळ्याची सुरूवात काहिसा उशीरा झाली. मात्र सतत होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या धानाच्या पेरण्यासह सर्व पेरण्या रखडल्या आहेत.

सततच्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या
काचेवानी : पावसाळ्याची सुरूवात काहिसा उशीरा झाली. मात्र सतत होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या धानाच्या पेरण्यासह सर्व पेरण्या रखडल्या आहेत. त्याच बरोबर सर्वच शेतीची कामे जसेच्या तसे पडून आहेत.
पावसाळ्याची सुरूवात रोहिनी नक्षत्रापासून होते. मात्र पाण्याची शक्यता नाममात्र असते. मृग नक्षत्रात पेरण्यायोग्य पाऊस येतो, अशी शेतकऱ्यांची समज आहे. या नक्षत्रात पेरण्या पूर्ण केल्यास पेरण्या यशस्वी होतात, असा सर्वसामान्यांचा विश्वास असतो. परंतु गेल्या दशकापूर्वीची आणि आताची समस्या पाहता हे आकलन नाहिसे झाल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी पावसाने काही दिवस उशिरा हजेरी लावली. मात्र पावसाने शेतकऱ्यांना मोकळीकता दिली नसल्याने पेरण्याची कामे अपवाद वगळता जसेच्या तसेच पडून आहेत. ज्यांच्या शेतात कृत्रिम पाण्याचे साधन आहेत, त्यांनी पाऊस येण्याच्या पूर्वी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांची शेती नैसर्गिक पाण्यावर आधारित आहेत, त्यांच्या पूर्ण पेरण्या आताही होण्यास आहेत.
काही शेतकऱ्यांनी पंपाच्या सहाय्याने पेरण्या केल्या. त्या पेरण्यासुध्दा पावसाच्या पाण्यामुळे सडण्याच्या मार्गावर आहेत. पेरण्याच्या वेळी पावसाची पंधरा दिवस मोकळीकता असायला हवी. तेव्हाच पेरणी पूर्व मशागत व पेरणीनंतर मशागतीची कामे पूर्ण केली जातात. ही सर्व शेतकऱ्यांची कामे पडून आहेत.
याशिवाय अन्य पेरण्यांमध्ये तुरीच्या पेरण्या, तिळाच्या पेरण्या तसेच इतर पेरण्या रखडल्या आहेत. तुळीचे पीक लावणे आता कठीण झाले आहे. सध्या पेरण्याचे कार्य वीस दिवस उशिरा झाले आहे. येत्या पंधरा दिवसात पेरण्या करण्यात आल्या नाही तर शेतकरी पुन्हा संकटात सापडणार व शेतकऱ्यांना चिखलातील पेरण्या कराव्या लागतील. मात्र चिखलातील पेरण्या केल्याने धान खराब होण्याची शक्यता असते. (वार्ताहर)